अकोला: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेने युतीची घोषणा करून संयुक्तपणे सुरू केलेल्या प्रचारामध्ये वापरण्यात येणाऱ्या रथावरील पोस्टरवर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला स्थान दिले नव्हते. ही बाब ‘लोकमत’ने ३० मार्चच्या अंकात प्रसिद्ध करताच शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली. अनेकांनी या बातमीचे कात्रण थेट ‘मातोश्री’पर्यंत पाठविल्याने अखेर भाजपाने आपली चूक सुधारत प्रचार रथावर बाळासाहेबांचे छायाचित्र प्रकाशित केले आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ विधानसभा मतदारसंघनिहाय प्रचार रथ फिरत आहेत. या प्रचार रथाच्या शुभारंभालाही शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. या दोन्ही पक्षात समन्वय नसल्याने केवळ भाजपाचाच प्रचार सुरू असल्याचे चित्र होते. गेल्या पाच वर्षांत अकोल्यामध्ये भाजपा, शिवसेनेने मित्रपक्ष म्हणून कोणतीच निवडणूक लढविली नाही तसेच भाजपानेही शिवसेनेला गृहीतही न धरता आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातच मोठी स्पर्धा आहे. आता लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा युती झाल्यामुळे शिवसेनेला भाजपासोबत राहणे क्रमप्राप्त ठरले आहे. या पृष्ठभूमीवर सेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपाकडून सन्मानाची अपेक्षा असताना प्रचार रथावर शिवसेनेसाठी आराध्य असलेल्या बाळासाहेबांचाच फोटो रथावर नसल्याचे ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच सामान्य शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त झाला. ‘लोकमत’च्या फेसबुक पेजवर शेकडो नेटिझन्सनी शिवसेनेलाच धारेवर धरले. या सर्व प्रकाराची माहिती ‘मातोश्री’पर्यंत पोहोचल्याने भाजपाच्याही अडचणी वाढल्या. भाजपासाठीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब श्रद्धास्थानी असल्याने झालेली चूक तत्काळ दुरुस्त करण्यात आली व रविवारी बाळासाहेबांचा फोटोअसलेले प्रचार रथ मतदारसंघात धावू लागले आहेत.