अकोला: दिवाळीच्या दिवसांत रस्त्यावर दुकाने थाटणाऱ्या किरकोळ व लघू व्यावसायिकांमुळे शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असल्याच्या पृष्ठभूमीवर यंदा महापालिका प्रशासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. संबंधित ठिकाणी मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यास प्रशासनाला अपयश येताच अखेर रस्त्यावरच दिवाळीचा बाजार थाटण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे.दिवाळीच्या सणासाठी विविध साहित्याची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातून लघू व किरकोळ व्यावसायिक शहरात दाखल होतात. यामध्ये प्रामुख्याने रेडीमेड कपडे, रंगीबेरंगी आकाश कंदील, लक्ष्मीच्या सुबक मूर्ती, पणत्या, दिवे, बत्ताशे, खेळभांडे, फुलांसह गृहोपयोगी साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. संबंधित व्यावसायिक गांधी रोड, टिळक रोड, जुना भाजी बाजार, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज, गांधी रोड ते धिंग्रा चौक, गांधी चौक तहसील कार्यालय आदी ठिकाणी दुकाने थाटण्याला प्राधान्य देतात. यामुळे दिवाळीच्या तीन-चार दिवसांत मुख्य बाजारपेठ जाम होत असल्याचे दिसून येते. विक्रेत्यांसह ग्राहकांची चिक्कार गर्दी असल्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता राहते. त्यामुळे यंदा लघू-किरकोळ व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मनपा प्रशासनाने नियोजन केले होते. उपलब्ध जागेवर मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याने नाइलाजाने लघू व्यावसायिकांवर रस्त्यावर बाजार मांडण्याची वेळ आल्याचे चित्र समोर आले आहे.पोलिसांची दमछाक!शहराच्या मध्यभागी वसलेल्या बाजारपेठेत विविध साहित्याची विक्री करणाºयांची भाऊगर्दी व अकोलेकरांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अशा स्थितीत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सिटी कोतवाली पोलिसांची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे.