खेट्री : पातूर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड सेंटर सुरू करण्याबाबतचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना पत्राद्वारे दिले आहेत.
चतारी येथे ग्रामीण रुग्णालय परिसरातील ३५ ते ४० गावांतील रुग्ण उपचारासाठी दररोज येतात. सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. परिसरातील रुग्णांना उपचारासाठी अकोला, पातूर येथे जावे लागते. लॉकडाऊनमुळे बस व खासगी प्रवासी वाहतूक बंद असल्याने रुग्णांना अडचण निर्माण होत होती. रुग्णांना वेळेवर तत्काळ उपचार मिळावा, यासाठी बाळापूर मतदारसंघातील माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी चातारी ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे रेटून धरली होती. बळीराम सिरस्कार यांची मागणीला यश मिळाले असून, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना चतारी येथे ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश पत्राद्वारे दिली आहे. तसेच बळीराम सिरस्कार यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा सुद्धा केली, येत्या आठवडाभरात कोविड सेंटर सुरू करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी सिरस्कार यांना दिले आहे. त्यामुळे परिसरातील ३५ ते ४० गावांतील ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
-----------------------------
रुग्णांची अडचण लक्षात घेत चतारी ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती. राजेश टोपे यांनी मागणीला हिरवी झेंडी देऊन कोविड सेंटर सुरू करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
बळीराम सिरस्कार, माजी आमदार