अकोला, दि. ८ : मैत्रेय प्रा. लि. कंपनीने शहरातील ८00 च्यावर गुंतवणूकदारांची साडेचार कोटी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी ३ ऑगस्ट रोजी रामदासपेठ पोलिसांनी कंपनीचे संचालक आणि शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सोमवारी अकोला क्रिकेट क्लबसमोरील एका कॉम्प्लेक्समधील मैत्रेय कंपनीच्या कार्यालयाला सील ठोकले. या ठिकाणावरून पोलिसांनी काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने प्लॉट खरेदीच्या नावाखाली गुंतवणूक करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार ३ ऑगस्ट रोजी उघडकीस आला. पोलिसांनी कंपनीचे संचालक वर्षा सत्पाळकर, जनार्दन परूळेकर आणि शाखा व्यवस्थापक अशोक बैसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर गुरुवारी अनेक गुंतवणूकदार पुढे आले. त्यांनी कंपनीने शहरातील आठशेच्यावर गुंतवणूकदारांची तब्बल साडेचार कोटी रुपयांच्यावर फसवणूक केल्याचा दावा काही गुंतवणूकदारांनी केला. त्यानंतर रामदासपेठ पोलिसांनी ठाणेदार सुभाष माकोडे यांच्या मार्गदर्शनात सोमवारी दुपारी अकोला क्रिकेट मैदानासमोरील एका कॉम्प्लेक्समध्ये असलेले मैत्रेयचे कार्यालय सील केले. या ठिकाणावरून पोलिसांनी कंपनीची व गुंतवणूकदारांकडून घेतलेले प्रतिज्ञापत्र व इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोटभरे करीत आहेत.
अखेर, मैत्रेय कंपनीचे कार्यालय सील!
By admin | Published: August 09, 2016 2:40 AM