अकोला : प्रशासन लवकरच गुटखा मुक्त अकोलासाठी सर्वसमावेशक पथक गठीत करून अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांना कायमचा प्रतिबंध घालणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी दिल्यानंतर ‘कंझ्यूमर प्रोटेक्शन’ संघटनेच्या सदस्यांनी मंगळवारपासून सुरु केलेल्या त्यांच्या बेमुदत उपोषणाची सांगता शुक्रवारी सायंकाळी केली. यावेळी अन्न व औषधी विभागाचे सहायक आयुक्त राठोड व महसूल अधिकारी उपस्थित होते.अकोला शहरात शासनाचा बंदीचा आदेश पायदळी तुडवून गुटखा विक्री चौफेर होत आहे. गुटखा विक्री करणाऱ्यां विरुद्ध कठोर कार्यवाही करून अकोला जिल्हा गुटका मुक्त करावा या मागणीसाठी नॅशनॅलिस्ट कंझ्यूमर प्रोटेक्शन आॅर्गनायझेशन च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० एप्रिल पासून संजय पाठक यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. पाठक यांच्यासह डॉ. धनंजय नालट, डॉ. दिवाकर तायडे, सुनीता धुरंदर, टीना देशमुख, आस्मा देशमुख, संगीता नानोटे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषण आरंभिले होते. दरम्यान, यवतमाळ, अमरावती, वाशीम समवेत जिल्ह्यातील अनेक सामाजिक व राजकीय पक्षांनी या उपोषणास पाठिंबा जाहीर करून या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले होते. पालकमंत्री डॉ.पाटील यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा कचेऱ्यांवर पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी दिला.यावेळी कार्य संघटन सचिव कैलास सचिव, सचिव रितेश पेटकर, विदर्भ संपर्क प्रमुख शंकर कंकाळ, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर विसपुते, रामराव उपर्वट, जावेद देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा विद्या जवके,संतोष हिरोळकर, श्रीकांत आमले, दिनेश रत्नपारखी आदी पदाधिकारी उपस्थित होते.