अकोला : मुलगा कितीही वाईट, व्यसनी असला तरी आईचा त्यात जीव गुंतलेला असतो. मुलाने कितीही लाथाडले तरी त्याच्या हजार चुका माफ करीत आई त्याला पोटाशी कवटाळते आणि त्याच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार होते. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना खदान परिसरातील शास्त्रीनगर भागात घडली. सतत मद्य प्राशन करणाऱ्या युवकाचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे दु:ख सहन न झाल्याने आईलाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच तिचा मृत्यू झाला. आईची माया खरचं वेडी असते. मुलगा दररोज घरी दारू पिऊन यायचा. शिव्या हासडायचा. परंतु ती निमूटपणे सहन करायची. कारण ती आई होती म्हणून. तरीही ती त्याला जीव लावायची. त्याची काळजी घ्यायची. परंतु मुलांना आईच्या मायेची, तिच्या प्रेमाची किंमत नसते. आई मुलांवर जीव ओवाळून टाकायला मागेपुढे पाहात नाही. गुरुवारी खदान परिसरात त्याची प्रचिती आली. संजय (३५) नामक युवकाला दारूचे व्यसन होते. दररोज दारू पिऊन घरी यायचा. आई उमा त्याला समजावयाची; परंतु संजय तिचे ऐकत नसे. हीच दारू त्याच्या मृत्यूचे कारण ठरली. गुरुवारी अतिमद्य प्राशनामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यूची माहिती कळताच आई उमाबाई गलबला करू लागली. धाय मोकलून रडू लागली. ऐन तारुण्यात मुलाच्या जाण्याचे तिला अतीव दु:ख झाले. तिचा आधारच गेला. मुलाच्या पार्थिवाकडे ती खचलेल्या मनाने पाहू लागली. त्याच्या चेहऱ्याहून वारंवार हात फिरवित होती. मुलाचा मृत्यू झाला, हेच तिचे मन स्वीकारायला तयार नव्हते. मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने उमाबाईलाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु त्यापूर्वीच त्यांनी मृत्यूला जवळ केले. काही तासांपूर्वी मुलाचा मृत्यू झाला आणि नंतर त्याच्या आईचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुलाच्या आणि आईच्या पार्थिवावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याचा बिकट प्रसंग कुटुंबीय आणि नातेवाईकांवर ओढवला. अत्यंत शोकाकूल वातावरणात दोघा माता-पुत्रांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली नव्हती.
मुलापाठोपाठ आईनेही कवटाळले मृत्यूला!
By admin | Published: August 07, 2015 1:32 AM