नैसर्गिक संकट कधीही पूर्वसूचना देऊन येत नाही. परंतु त्याचा सामना करण्यासाठी मनपा प्रशासनाची यंत्रणा सक्षम असणे अपेक्षित आहे. याठिकाणी प्रशासन व अग्निशमन विभागाचा आपसात समन्वय नसल्याचे वारंवार समाेर आले आहे. प्रशासनाच्या नियाेजनशून्य कारभारामुळे सखल भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाल्याचा प्रत्यय २१ जुलै राेजी रात्री आला. मुसळधार पावसाचे तसेच नाल्यांमधील घाण सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी सक्षम असल्याचा दावा करणाऱ्या नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाकडेच साहित्याचा अभाव असल्याचे समाेर आले. सखल भागातील पाण्याचा उपसा करण्यासाठी या कक्षाकडे माेटर पंपाचा अभाव असल्यामुळे नागरिकांनी स्वत: पाण्याचा उपसा केला. या विभागातील आवश्यक साहित्य खरेदीच्या प्रस्तावाला प्रशासनाने जुलै महिन्यांत मंजुरी दिली असून सदर साहित्य कधी प्राप्त हाेते,याकडे अकाेलेकरांचे लक्ष लागले आहे.
अग्निशमन विभागाचे ऑडिट का नाही?
२०१८ मध्ये चक्रीवादळामुळे शहरात माेठ्या प्रमाणात वित्तहानी झाली हाेती. त्यावेळी तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांनी नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी झाेननिहाय पाण्याचा उपसा करणारे माेटर पंप, कुदळ, फावडे खरेदीचे निर्देश अग्निशमन विभागाला दिले हाेते. त्यानंतर साहित्याची खरेदी करण्यात आली. २१ जुलै राेजीचा अनुभव पाहता अग्निशमन विभागाचे ऑडिट करण्याची मागणी सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी केली आहे.
या साहित्याची हाेणार खरेदी
अग्निशमन विभागाने सादर केलेला ४०० फूट दाेर, दाेन माेटर पंप, पाच चार्जेबल बॅटरी, २५ गम बूट आदी साहित्याचा प्रस्ताव प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी मंजूर केला आहे.
खरेदीसाठी आयुक्तांनी दिली मान्यता
३०० फूट दाेर, २० नग हॅन्डग्लाेज, १६ नग जॅकेट, फेसमास्क दहा नग, पाच पंप, चार्जेबल बॅटरी १५, गमबूट ३० ला मंजुरी.