लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सेवारत असलेल्या महिला डॉक्टर व अधिपरिचारिका यांच्यातील वैयक्तिक वादावरून अधिसेविका व संबंधित अधिपरिचारिकेला महाविद्यालय प्रशासनाकडून बजावण्यात आलेली नोटीस मागे घेतानाच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गठित करण्यात आलेली चौकशी समिती अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सोमवारी बरखास्त केल्यानंतर अधिपरिचारिकांनी त्यांचे कामबंद आंदोलन मागे घेतले.वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. वैशाली कोटंबकर (कोरडे)आणि अधिपरिचारिका जयश्री भदे (लाखे) यांच्यात बुधवार, ७ मार्च रोजी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेला वाद पोलीस ठाण्यात पोहचला होता. परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हाही दाखल झाला. दरम्यान, या प्रकरणी डॉ. वैशाली कोटंबकर यांनी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी डॉ. कार्यकर्ते यांनी चौकशी समिती गठित करतानाच अधिपरिचारिका जयश्री भदे यांना शासकीय निवासस्थान रिकामे करण्याचे पत्र दिले. तसेच जयश्री भदे यांच्याविरुद्ध कारवाई न केल्याप्रकरणी अधिसेविका ग्रेसी मरियम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. वैयक्तिक स्वरूपाच्या वादात महाविद्यालय प्रशासनाने हस्तक्षेप केल्यामुळे अधिपरिचारिकांच्या संघटनेने ग्रेसी मरियम यांच्याविरुद्धची कारणे दाखवा नोटीस मागे घ्यावी, तसेच अधिसेविका जयश्री भदे यांना बजावलेली नोटीस रद्द करण्याची मागणी करीत शनिवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले. सोमवारी सकाळी अधिपरिचारिकांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या देऊन काम बंद आंदोलनाचा इशारा दिला. अखेर डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी या प्रकरणी गठित केलेली चौकशी समिती बरखास्त करून, अधिसेविका ग्रेसी मरियम यांच्याविरुद्ध बजावलेली कारणे दाखवा नोटीस मागे घेत असल्याचे पत्र दिले. त्यानंतर अधिपरिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला.
आंदोलनाने रुग्णसेवा प्रभावितसकाळी ८ वाजता अधिपरिचारिकांनी काम बंद आंदोलनास सुरुवात केली. डॉक्टर आणि अधिपरिचारिका यांच्यातील वाद चिघळल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. तब्बल चार तास रुग्णसेवा विस्कळीत झाल्याने, अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी चौकशी समिती बरखास्त करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
अधिपरिचारिका व सहयोगी प्राध्यापक यांच्यातील वाद हा वैयक्तिक स्वरूपाचा असून, दोघींनीही परस्परांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणी संबंधितांना बजावलेल्या नोटीस मागे घेतल्या व चौकशी समितीही गुंडाळली आहे. रुग्णसेवा अविरत सुरू ठेवण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. - डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.