- आशिष गावंडे
अकाेला: अकोला: मनपातील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी विधान परिषदेच्या उप-सभापती निलम गोऱ्हे यांनी आमदारांचा समावेश असलेल्या विशेष उप-समितीचे गठन केले हाेते. शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया यांच्या अध्यक्षतेखालील समिती लवकरच महापालिकेकडून लेखाजाेखा मागणार असल्याची माहिती आहे. यादरम्यान, ‘अमृत’अभियानसह विविध याेजनांमध्ये झालेले घाेळ चव्हाट्यावर येण्याच्या धास्तीने सत्ताधारी भाजपच्या चिंतेत वाढ हाेण्याची चिन्हं आहेत.
महापालिकेच्या अनागोंदी कारभारासंदर्भात शिवसेनेचे विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी शासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. केंद्र शासनाच्या ‘अमृत’अभियानमधील भूमिगत गटार याेजनेचे काम नियमबाह्यरीत्या सुरू असल्याची तक्रार आ. बाजाेरियांनी शासनाकडे केली हाेती. त्यावेळी तत्कालीन पर्यावरण मंत्री ना. रामदास कदम यांनी सदर याेजनेच्या कामाला स्थगिती दिली हाेती. हा स्थगनादेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उठविला हाेता. यासाेबतच निकृष्ट सिमेंट रस्ते घोळ, फोर- जी प्रकरण, शासनाकडून प्राप्त अनुदानाचा गैरवापर, पंतप्रधान आवास योजना तसेच १२ व्या व १३ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अनियमितता यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी आ. बाजाेरियांनी शासनाकडे लावून धरली हाेती. यासंदभार्त विधान परिषदेच्या उप-सभापती निलम गोऱ्हे यांनी या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष उप-समिती गठीत केली. उप-समितीने महापालिकेस भेट देऊन प्रकल्पांची पाहणी करणे यासह संबंधित अधिकाऱ्यांची साक्ष नाेंदविण्याचा समावेश आहे.
यांच्याकडून हाेणार चाैकशी
मनपाच्या गैरकारभाराची पुनर्तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषद नियम १६७ मधील तरतुदीच्या अनुषंगाने विधान परिषद सदस्यांचा समावेश असलेल्या उप-समितीमध्ये गट प्रमुख म्हणून विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया, आ. शरद रणपिसे, आ. नागोराव गाणार, आ. डॉ. मनिषा कायंदे, आ. विलास पोतणीस यांचा समावेश आहे. विशेष निमंत्रित म्हणून अमरावती विभागीय आयुक्त, कार्यकारी अभियंता, सा.बां. वि. अकोला तसेच कार्यकारी अभियंता मजीप्रा, अकोला यांचा समावेश राहणार असून, संबंधितांकडून चाैकशी केली जाणार आहे.
अधिकारी सापडणार कचाट्यात
शासनाच्या उप-समितीकडून केल्या जाणाऱ्या चाैकशीत भूमिगत गटार याेजना, पाणी पुरवठा याेजनेतील अनियमितता तसेच निकृष्ट सिमेंट रस्तेप्रकरणी मनपातील जलप्रदाय विभाग तसेच बांधकाम विभागातील काही अधिकारी कचाट्यात सापडणार असल्याची माहिती आहे.