अकोला : वापरलेल्या विजेचे पैसे भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या घरगुती व इतर वर्गवारीतील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावलेल्या महावितरणने आता शेतकऱ्यांना शॉक देण्याची तयारी सुरू केली आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत जिल्ह्यातील एकूण ९१ शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. आतापर्यंत बिल थकविणारे घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहक महावितरणच्या रडारवर होते. गत महिन्यापासून उघडपणे नसली तरी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचे कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू झाली आहे. जिल्ह्यात ६६,३८४ कृषी पंपधारक शेतकरी असून, त्यांच्यावर मोठी थकबाकी आहे. ऑगस्ट महिन्यात ७९, तर सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत १२ अशा एकूण ९१ कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यांपैकी काही कृषिपंपांचा वीजपुरवठा तात्पुरता, तर काही कृषिपंपांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित केलेल्या ९१ शेतकऱ्यांकडे १२ लाख ३९ हजार रुपयांची थकबाकी आहे.
उपविभागनिहाय अशी केली कारवाई
उपविभाग थकबाकी कापलेले कनेक्शन
अकोला ग्रामीण १ लाख ५६ हजार १०
बाळापूर ९२ हजार १
बार्शीटाकळी ७४ हजार ४
पातूर १ लाख ७२ हजार १६
अकोट ५ लाख ४५ हजार ५४
तेल्हारा २ लाख ६
००००००००००००००००००००००००००००००००००००००००
एकूण १२ लाख ३९ हजार ९१
कृषिपंप धोरणास प्रतिसाद नाही
सरकारने शेतकऱ्यांना वीजबिल थकबाकीतून मुक्त करण्यासाठी आणलेल्या नव्या कृषिपंप धोरणास जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. एकूण ६६,३८४ कृषिपंपधारकांपैकी केवळ ५ हजार १०४ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे महावितरणने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याने महावितरणने आता थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे.