लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वर्षभरात कितीही प्रवास केला तरी अर्धे तिकीट लागेल, या अलिखित सवलतीला ज्येष्ठ नागरिकांना आता मुकावे लागणार आहे. स्मार्ट कार्ड मिळताच प्रवासाचा हिशेब सुरू होणार आहे. चार हजार किलोमीटर संपताच पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे.ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात वर्र्षभरात चार हजार किमीचा प्रवास करता येतो; मात्र त्याची मोजणी होत नव्हती. आधार कार्ड, मतदान कार्ड या आधारे अर्धे तिकीट दिले जात होते. या मर्यादेपासून सवलत घेणारही अनभिज्ञ होते. आता एसटी महामंडळ सवलत घेणाऱ्यास स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे.१ एप्रिल ते ३१ मार्च, अशी एक वर्ष स्मार्ट कार्डची मुदत राहील. प्रत्येक वर्षी नूतनीकरण करावे लागेल. ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड मशीनद्वारे स्वाइप केले जातील. याद्वारे कार्डधारकांनी नेमका किती प्रवास केला, याची माहिती वाहकाला मिळणार आहे. प्रवास सवलत चार हजार किमीचा हिशेब प्रत्येक प्रवासात होणार आहे. चार हजार किलोमीटर संपले की, वाहक पूर्ण तिकीट फाडणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता आपण किती प्रवास केला, याची मोजदाद करावी लागणार आहे. स्मार्ट कार्डची नोंदणी केली जात आहे.ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नाही, त्यांच्याकडील आधार कार्ड पाहून त्यांना अर्ध्या तिकिटाने प्रवास करू दिला जाणार आहे. पुढील काळात मात्र अर्ध्या तिकिटासाठी आधार तुटणार आहे. स्मार्ट कार्ड योजना लागू झाल्याने प्रवासादरम्यान होणारी बोगसगिरी आणि महामंडळाचे होणारे नुकसान थांबणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड दिले जाणार असल्याने आधार कार्ड, मतदान कार्डची गरज नाही. स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी ज्येष्ठांना ५५ रुपये शुल्क आकारले जात आहे. आॅनलाइन नोंदणीनंतर स्मार्ट कार्ड आधारशी लिंक केले जाते.महाराष्ट्र राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार धोरणात्मक नियमावली लावून दिली आहे. त्यानुसार स्मार्ट कार्डच्या सवलती राज्यभरात देण्यात येत आहेत.-चेतना खिरवाळकर, विभागीय नियंत्रक, अकोला.