तेल्हारा: तालुक्यातील अकोली रूपराव येथील एका शेतकऱ्याने कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर साडेतीन एकरातील कपाशीचे पीक करपल्याची घटना शनिवारी घडली. अचानक घडलेल्या या प्रकराने हतबल झालेल्या या शेतकºयाने आता कीटकनाशकाच्या गुणवत्ता तपासणीसाठी संबंधित विभागात तक्रार करण्याची भूमिका घेतली आहे.अकोली रूपराव येथील रूपेश नाजुकराव लासुरकार यांनी ठोक्याने शेत केले आहे. साडेतीन एकर क्षेत्रावर त्यांनी कपाशीची लागवड केली आहे. लागवडीने केलेल्या शेतात कपाशी पिकांचे पेरणीपासून फुलपत्यावर येई पर्यंत मोठ्या मेहनतीने मशागत करून जोपासना केली. कपाशीवर किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रूपेश लासुरकार यांनी शनिवार, २५ आॅक्टोबर रोजी कीटकनाशकाची फवारणी केली. फवारणीनंतर काही वेळातच पीक करपल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मोठ्या मेहनतीने जोपासलेले उभे हिरवेगार कपाशी पीक सुकत असल्याने रूपेश लासुरकार हताश झाले आहेत. याबाबत खरेदी केलेल्या फवारणी औषधीतील गुणवत्तेबाबत तक्रार सोमवारी करणार असल्याचे रूपेश लासुरकार यांनी सांगितले. शेतातील कपाशी पिकांची नुकसान भरपाई व फवारणी औषधाचे गुणवत्ता तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.ठोक्याने केले शेतरूपेश लासुरकार यांनी गावातीलच साडेतीन एकर शेत ठोक्याने केले आहे. कपाशीची लागवड करून भरघोस उत्पन्न घेण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने पीकही जोमदार आले; परंतु फवारणी केल्यानंतर साडेतील एकरातील कपाशी करपल्याने त्यांचे स्वप्न भंगले आहे.