शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसचे अभ्यासवर्ग सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरू झाले. एका पाठोपाठ एक, असे एकूण ५२ विद्यार्थ्यांचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अभ्यासवर्ग बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. विद्यार्थ्यांपाठोपाठ आता निवासी डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयातील १५ निवासी डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर असे एकूण ६७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसोबतच डॉक्टरांमध्ये वाढता कोरोना संसर्गाचे प्रमाण चिंताजनक असून योग्य वेळी खबरदारी घेण्याची गरज आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या चाचण्यांवर भर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महाविद्यालय प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारी म्हणून या विद्यार्थ्यांची नियमित स्क्रिनिंग सुरू असून गरजेनुसार त्यांची कोविड चाचणी करुन घेण्यात येत आहे. बहुतांश विद्यार्थी हे वसतिगृहातील असल्याने निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
डॉक्टरांना संसर्ग चिंताजनक
सर्वोपचार रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्या तुलनेत रुग्णसंख्या वाढत असल्याने जीएमसी प्रशासनावर ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत निवासी डॉक्टरांनाही कोविडची लागण होऊ लागल्याने मनुष्यबळाची तूट आणखी जाणवू लागली आहे. हे प्रमाण असेच कायम राहिल्यास परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१५ निवासी डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. पॉझिटिव्ह विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खबरदारी म्हणून वसतिगृहाचे निर्जंतुकीकरण केले जात असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्यकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
- डॉ.श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी,अकोला