पातूर : गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व शाळा-महाविद्यालये बंद होती. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या दृष्टीने शासनाने २७ जानेवारीपासून वर्ग ६ ते ८ सुरू केले. त्यानुसार तालुक्यातील ८३ शाळा उघडल्या असून, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा ऐकायला येत आहे.
शाळा सुरू होणार असल्याने तालुक्यातील ८३ शाळांमधील ३१५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी पातूर, बाभूळगाव, सस्ती, मळसुर, आलेगाव येथील आरोग्य केंद्रावर करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने अनलॉक प्रक्रियेत टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्याच पार्श्वभूमीवर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तालुक्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. शाळांनी कोविड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करून शाळांचे निर्जंतुकीकरण केले आहे तर विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिमीटर तपासणी व सॅनिटायझरने हात स्वच्छ करूनच विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जात आहे. शाळांनी पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला असून त्यासंदर्भात पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी संमतीपत्र भरून घेतले जात आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्व परिस्थिती अनुकूल असली तरी विद्यार्थी व शिक्षकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. चिराग रेवाळे यांनी केले आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी, सर्व वर्गखोल्यांची साफसफाई, निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शिकवणीला सुरुवात केली असून विद्यार्थी व पालकांचे सहकार्य मिळत आहे.
- सचिन ढोो, मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा, पातूर
शिक्षकांनी १५ जून २०२० व २९ ऑक्टोबर २०२० तसेच १० नोव्हेंबर २०२० रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी सहकार्य करावे.
- अनिल अकाळ, गटशिक्षणाधिकारी पं.स., पातूर