मनोज भिवगडे, अकोला : लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात १३ हजार ४२९ नव्या मतदारांची भर पडली आहे. या प्रारूपावर २० ऑगस्टपूर्वी दावे, हरकती दाखल करता येणार आहे. अंतिम मतदार यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल.
लोकसभा निवडणुकीसाठी ४ एप्रिल २०२४ रोजी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या मतदार यादीनुसार विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या यातीत जिल्ह्यातील पाचही विधासभा मतदारसंघात एकूण १३ हजार ४२९ नव्या मतदारांची भर पडली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. हे प्रारुप जिल्हा, उपविभागीय, तसेच तहसील कार्यालये येथे प्रसिद्ध करण्यात आले आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडेही प्रारूप यादी उपलब्ध आहे.
कोणताही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये-जिल्हाधिकारी१ जुलै २०२४ या दिनांकास वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी. कोणताही पात्र व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यापासून वंचित राहू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.