२५ डिसेंबर रोजी ख्रिसमस, २६ डिसेंबर रोजी शनिवार व २७ डिसेंबर रोजी रविवार अशा सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्याने सरकारी कार्यालयांचे कामकाज बंद होते. सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर सोमवार, २८ डिसेंबर रोजी सरकारी कार्यालयांचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९.४५ वाजता निर्धारित करण्यात आली आहे; मात्र जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत निर्धारित वेळेपेक्षा पाच कर्मचारी विलंबाने कार्यालयात हजर झाले, तसेच निर्धारित वेळेत कार्यालयात पोहोचलेले काही कर्मचारी हजेरी पत्रकात स्वाक्षरी केल्यानंतर जिल्हा परिषद परिसरात गप्पांमध्ये रंगल्याचे आढळून आले. निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने कार्यालयात हजर झालेल्या आणि निर्धारित वेळेपर्यंत कार्यालयात पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांकडून निवांतपणे कामकाजाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर सोमवारही जिल्हा परिषदेतील समाजकल्याण, महिला व बालकल्याण, लघुसिंचन, पशुसंवर्धन, बांधकाम, कृषी, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पाणी पुरवठा, सामान्य प्रशासन विभाग इत्यादी विभागांच्या कार्यालयांमध्ये आरामाचाच असल्याचे वास्तव समोर आले.
एकूण कर्मचारी : १९२
सुटीवर असणारे: १९
वेळेवर हजर : १५९
लेटमार्क मिळालेले : ५
अधिकारी बैठकमध्ये!
तीन दिवसांच्या सलग सुट्ट्यांनंतर सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभाग प्रमुखांची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.