अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये दाखल रुग्णाला ‘ओ’ निगेटिव्ह गटाच्या रक्ताची गरज असताना एक रक्तदाता रक्तदानास समोर आला. मात्र, तांत्रिक अडचणी सांगत त्याला रक्त संकलनास नकार दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीत घडली. रक्तदात्याच्या मते, दुपारी तीन वाजेपासून ते रक्तपेढीच्या उंबरठ्यावर रक्तदानासाठी उभे होते. मात्र, रात्री आठ वाजेपर्यंतही त्यांचे रक्त संकलित करण्यात आले नाही. प्राप्त माहितीनुसार, सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये दाखल २९ वर्षीय रुग्णाला ‘ओ’ निगेटिव्ह रक्ताची गरज असल्याचे डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाइकांनी सांगितले. त्यानुसार, रुग्णाचे नातेवाईक सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीत पोहोचले. मात्र, येथे ‘ओ’ निगेटिव्ह रक्तगट उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तेव्हा रुग्णाच्या नातेवाइकांनी ओ निगेटिव्ह गटाचा रक्तदाता उपलब्ध करून दिला. मात्र, त्याच्या रक्तसंकलनास रक्तपेढीने नकार दिला. रक्तदाता रक्तदानासाठी शुक्रवारी दुपारी ३ वाजेपासून रक्तपेढीच्या उंबरठ्यावर हाेता. मात्र, तांत्रिक अडचण सांगून त्याचे रक्त संकलनास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. रात्रीचे आठ वाजले तरी रक्तदात्याकडून रक्त संकलित करण्यात आले नसल्याने रक्तदाता संतप्त झाल्याने काही वेळासाठी रक्तपेढी परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
काय आहे तांत्रिक समस्या?
रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांच्या मते रुग्णाच्या नातेवाइकांकडून आज किंवा उद्याच रक्त द्यावे. मात्र, संकलित केलेल्या रक्ताच्या संपूर्ण चाचण्या केल्याशिवाय ते रुग्णाला देणे शक्य नाही. रात्रीच्या वेळी रक्ताच्या चाचण्या करणे शक्य नसल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
रुग्णास रक्त देण्यास रक्तदाता तयार असूनही त्याचे रक्त संकलित केले जात नाही. आम्ही नेहमीच सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीला रक्तदान करतो. मात्र, जेव्हा आम्हाला गरज पडते तेव्हा आम्हाला रक्त मिळत नाही. त्यामुळे यापुढे आम्ही शासकीय रक्तपेढीला रक्त देणार नाही.
- आशिष सावळे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना
आजच संकलित केलेल्या रक्ताची चाचणी करून ते रुग्णाला आजच उपलब्ध करून देणे शक्य नाही. रात्रीच्या वेळी रक्ताची चाचणी करणे शक्य नाही. रक्ताच्या चाचण्या पूर्ण केल्याशिवाय ते आम्ही रुग्णाला देऊ शकत नाही. रक्तपेढीतर्फे रक्तसंकलनास नकार दिला नाही.
- डॉ. अजय जुनगरे, विभागप्रमुख, शासकीय रक्तपेढी, जीएमसी, अकोला