अकोला : कोरोनाशी लढा देणाऱ्या विदर्भावर आता अस्मानी संकट उभे ठाकले आहे. ६५ कि.मी.पेक्षा अधिक वेगाने तौक्ते वादळ केरळच्या किनारपट्टीकडे निघाले आहे. याचा परिणाम पश्चिम वऱ्हाडातसुद्धा जाणवत आहे. रविवारी वादळी वाऱ्यासह परिसरात मुसळधार पाऊस झाला. आणखी काही दिवस या वादळाचे परिणाम जाणवणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. प्राथमिक अवस्थेत वादळ आखाती देशाकडे प्रयाण करणार असे संकेत वेध शाळेमार्फत दिले गेलेत. रविवारी वादळ गोवा-कोकण किनाऱ्याजवळ पोहोचले व आपल्या उच्चतम स्थितीपर्यंत पोहोचत आहे. वादळाचे विस्तारित टोक/घेर विदर्भापर्यंत पोहोचले आहे. पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात या वादळाचे परिणाम दिसून येत आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरात वादळी वारा सुटला होता. काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. ग्रामीण भागामध्ये घरांवरील टिनपत्रे उडाली, रस्त्यावरील झाडे कोसळली. तसेच वीज पुरवठा खंडित झाला होता. परिणामी, पश्चिम वऱ्हाडात वातावरण ढगाळलेले, उष्ण-दमट राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. राज्यात पावसाची शक्यता पश्चिम ते पूर्व अशी उतरत्या क्रमाने राहील, कोकणात जास्त, तर विदर्भात कमी राहणार आहे.
येत्या तीन-चार दिवसांत, सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता जास्त आहे. वादळ ओसरल्यावर मन्सूनची वाटचाल सामान्य म्हणजे १ जून रोजी केरळमध्ये पोहोचण्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत.
- संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक