अकोला : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असले तरी यावर मात करण्यास अनेकजण यशस्वी ठरत आहे. प्रबळ आत्मशक्ती व सकारात्मक विचारांमुळे शहरातील लहान उमरी येथील सेवानिवृत्त शिक्षक ९१ वर्षीय शालिग्राम नारायण राऊत यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. एचआरसीटी स्कोर ८, ऑक्सिजनची पातळी कमी, प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतरही ते आज रोजी ठणठणीत झाले आहे.शहरातील लहान उमरी भागातील गजानन पेठ येथील सेवानिवृत्त शिक्षक ९१ वर्षीय शालीग्राम नारायण राऊत हे कानशिवणी येथे एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. तेथे त्यांना ताप, खोकला, अंग दुखीचा त्रास जाणवू लागला. कोरोनाची लक्षणे आढळून येत असल्याने त्यांना तातडीने खासगी दवाखान्यात आणले. तेथे त्यांची कोरोना टेस्ट करून एचआरसीटी चाचणी करण्यात आली. त्यांचा एचआरटीसी स्कोर ८ व कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. ऑक्सिजनची पातळी कमी होत चालली होती. त्यांच्यावर घरी उपचार शक्य नसल्याने नातेवाइकांची व्हेंटिलेटर बेडसाठी शोधाशोध सुरू झाली. एका खासगी दवाखान्यात त्यांना बेड मिळाला. दिवसापरत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. नातेवाइक, आप्तेष्टांनी दिलेल्या सकारात्मक प्रोत्साहनाच्या जोरावर त्यांनी कमी कालावधीत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली.
--बॉक्स--
केवळ सात दिवसात प्रकृतीत सुधारणा
खासगी दवाखान्यात भरती केल्यानंतर त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावली होती. त्यांची प्रो बीएनबी टेस्ट झाली. अशक्तपणा खूप असल्याने दोन बॉटल रक्तही देण्यात आले. यावेळी त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात आले; कोरोनावर योग्य उपचार व यशस्वी लढा दिल्याने त्यांच्या प्रकृतीत सात दिवसांमध्ये सुधारणा झाली.
--बॉक्स--
युवकाला दिला बेड
केवळ सात दिवसांत राऊत यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यावेळी एका युवकाला व्हेंटिलेटर बेडची खूप आवश्यकता होती. युवकाची प्रकृतीही मोठ्या प्रमाणात खालावली होती. डॉक्टरांनीही राऊत यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी उपचाराचा सल्ला दिला. त्यामुळे राऊत यांनी त्यांचा बेड त्या युवकाला देण्याचा निर्णय घेतला.
--बॉक्स--
इतर दिवस घरीच उपचार
सात दिवसांनी दवाखान्यातून ते घरी आले. घरी त्यांची स्वतंत्र खोलीत राहण्याची सोय केली होती. दवाखान्यातून एक कर्मचारी दररोज शालिग्राम राऊत यांची तब्येतीची पाहणी करण्यासाठी येत असे.
--कोट--
वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच कुटुंब चिंताग्रस्त झाले होते; परंतु यावेळी मित्रमंडळी व नातेवाइकांनी धीर दिला. आस्थेने विचारपूस करत वेळोवेळी मदत केली. सर्वांच्या एकजुटतेने आलेल्या अडचणींवर मात करता आली.
- प्रा.सुभाष राऊत, मुलगा