पातूर : चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत 76 वर्षीय वृद्ध तांत्रिकाने चान्नी येथील 23 वर्षीय विवाहित युवतीला फूस लावून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या भावाने 15 मे रोजी चान्नी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील 76 वर्षीय गुलाब चिन्काजी काळबागे हे जवळपास दीड ते दोन वर्षांपासून चान्नी येथे कामधंदा करून राहत असत. गावातील लोकांना मी गुप्तधन काढतो, असे सांगून खोटे बोलत असत. अशातच युवती ही आपल्या पतीसोबत पटत नसल्यामुळे माहेरी आईवडिलांकडे राहण्यास आली होती. हा वृद्धसुद्धा मुलीच्या घरी ये-जा करत होता. अशातच तक्रारकर्त्याच्या बहिनीसोबत त्या वृद्धाची चांगली ओळख होऊन तिचे वृद्धासोबत संबंध जुळले. या ओळखीतून वृद्धाने त्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून माझ्याजवळ शेत आहे व गुप्तधन काढण्याचा माझा धंदा आहे. माझ्याजवळ खूप सोने आहे व शेती आहे. त्याचे मी काय करू, त्याला कोणी वारस नाही, असे खोटे बोलून 15 मे रोजी पहाटे 4 ते 5 वाजताच्या दरम्यान मुलीला घेऊन पळून गेला. अखेर मुलीच्या आईवडिलांनी व भावाने शोध घेतला असता ती व्याळा येथे असल्याचे समजले.तेथे वृद्धाच्या घरी गेले असता त्याने युवतीच्या आईवडील व भावाचे हातपाय तोडण्याची धमकी दिली. त्यामुळे त्या तांत्रिकावर कारवाई करून त्याच्या तावडीतून माझ्या बहिणीची सुटका करावी, अशी तक्रार चान्नी पोलीस स्टेशनला गणेश सुखदेव वानखडे यांनी दिली आहे. मुलीचा शोध घेतल्यानंतर तिला दक्षता समितीच्या सदस्यांसमोर उभे करून तिचा जबाबात घेतल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. कारण मुलगी सज्ञान आहे.- गजानन खर्डे ठाणेदार, चान्नी
म्हातारचळ! वृद्ध तांत्रिकाने 23 वर्षीय विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 12:32 PM