अकोला : हिट ॲन्ड रन कायद्याच्या विरोधात ट्रक चालक-मालक संघटनेने १० जानेवारीपासून सुरु केलेले आंदोलन अखेर सोमवार, १५ जानेवारी रोजी स्थगित करण्यात आले. पोलिस अधिक्षक बच्चनसिंग, स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासोबत आंदोलनाचे नेते जावेद खान पठाण यांच्यात चर्चा झाल्यानंतर गत सहा दिवसांपासून सुरु असलेले हे आंदोलन मागे घेण्यात आले.
अकोला चालक-मालक संघटनेच्या वतीने ९ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून स्टिअरिंग छोडो आंदोलन केले जात आहे. वाशीम बायपास येथे सर्व आंदोलक गाड्यांचे स्टिअरिंग सोडुन एकत्र बसत होते. मागणी पूर्ण होत नाही आणि हा कायदा रद्द केल्या जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल असा निर्धार आंदोलकांनी केला होता. मात्र सोमवारी दुपारी पोलिस अधिक्षक बच्चनसिंग, स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासोबत आंदोलनाचे नेते जावेद खान पठाण आणि कार्यकर्ते यांच्यात आंदोलनाबाबत चर्चा झाली. काँग्रेस नेते विवेक पारस्कर व राष्ट्रवादी काँग्रेस नेते रफीक सिद्दीकी यांनी मध्यस्थी केली.
यावेळी संयुक्त वाहन संघटनेचे अध्यक्ष विनोद नालट, संघर्ष वाहन असोसिएशनचे प्रशांत मराठे, अब्दुल आसिफ, वसीम, शे. मेहबूब, सुभाष तायडे, योगेश इंगळे, भगवान अहेर, गजानन अहिर, संदीप पाटील, राजू इंगळे, धनंजय आगरकर, ज्ञानेश्वर कवळकार आदींची उपस्थीती होती.