अकोला - शहरातील मध्य वस्तीत असलेल्या लक्कडगंजमध्ये शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या परिसरातील चार दुकाने व तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने लाखोंचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
लक्कडगंज परिसरातील विदर्भ टिंबर, दुर्गेश टिंबर मर्चंट, डेहनकर टिंबर मार्ट, नूर अहेमद टिंबर मर्चंट या चार लाकडांच्या दुकानांना शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या दुकानात लाकडांचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुकानाच्या बाजूला असलेल्या तीन घरांनाही आगीची झळ पोहोचल्याने या घरातील साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल व पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. या दुकानात लाकडी बल्ल्या ताट्या, प्लायवूडच्या शीट व बाकी चार घरातील साहित्य जळून खाक झाल्याने अंदाजे ४० ते ४५ लाखाचे नुकसान झाले. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग भीषण असल्यामुळे शहरात दूरवरून आगीच्या ज्वाला दिसत होत्या.
अग्निशमन दलाची दिरंगाई
आग लागल्याची घटना घडताच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र अग्निशमन दलाने घटनास्थळी येण्यास विलंब केला. आग विझवण्याकरिता सहा बंब लागले. किमान १५ मिनिटाच्या अंतरावर एक बंब घटनास्थळी पोहोचल्याने आग विझवण्यास विलंब झाला. अग्निशमन दलाच्या या ढेपाळलेल्या कारभारामुळे या परिसरातील नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केला.
अग्निशमन दलाचे अपुरे कर्मचारी
भीषण आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली; मात्र त्यांच्याकडे अपुरे कर्मचारी असल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांना सहकार्य केले. त्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली.
मनपा अधिकाऱ्यांची पाठ
अकोल्यातील मध्यवस्तीत लागलेल्या आगीने एवढा मोठा तांडव केल्यानंतरही महानगरपालिकेचा एकही अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी मनपा प्रशासनाविषयी रोष व्यक्त केला.
घटनास्थळी पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त
लक्कडगंज परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने व रामदास पेठ पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली. नेमकी आग कशाने लागली याचा तपास सुरू आहे.