अकोला : ना काटा... ना बी...रसाचे प्रमाण साठ टक्क्यांच्यावर...अशी रसाळ सीडलेस लिंबूची जात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केली. हेक्टरी उत्पादनही २० टनावर असल्याने या लिंबूची मागणी देशभर वाढली आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पांतर्गत लिंबूवर्गीय फळे विभागाने संत्रा, मोसंबी व लिंबूचे वाण विकसित केले आहे. यातील संत्रा पीडीकेव्ही-५ ही जात भरघोस उत्पादन देणारी असून, गोलाकार आहे. या संत्र्याचे फळ पिवळे असल्याने या फळाची मागणी वाढली आहे. लिंबाची वाढती मागणी बघता कृषी विद्यापीठाने लिंबूची चक्रधर ही जात विकसित केली. या लिंबाच्या झाडाला काटे येत नाहीत, तसेच फळात बियाही नाहीत, झाडाला काटे येत नसल्याने फळ तोडणे सोपे जाते. तीन वर्षांपूर्वी या लिंबाची जात प्रसारित करण्यात आली असून, आजमितीस या लिंबाची देशभर मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे, चक्रधर फळे ही झुपक्यामध्ये येतात. उत्पादनही २० टन आहे.विदर्भातील अकोला जिल्हा कागदी लिंबाची मोठी बाजारपेठ असून, या जिल्ह्यातील वाडेगाव परिसरात कागदी लिंबाचे फार मोठे क्षेत्र आहे. येथे दर्जेदार कागदी लिंबाचे उत्पादन होत असून, येथील कागदी लिंबाला उत्तर भारतात फार मोठी मागणी आहे. अकोल्यातूनच देशात राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेशासह इतर राज्यांत कागदी लिंबूची फळे पाठविली जातात. त्यामुळे या भागात लिंबू पिकाची लागवड दरवर्षी वाढतच आहे. याच अनुषंगाने या कृषी विद्यापीठाने लिंबूच्या जाती विकसित केल्या आहेत. मागच्या वर्षी याच कृषी विद्यापीठाने स्पेशल लोणचे बनविण्यासाठी ‘तृप्ती’ ही लिंबूची जात विकसित केली. तृप्तीलाही देशात मागणी वाढली आहे.
चक्रधर रसाळ, भरघोस उत्पादन देणारी लिंबूची जात असून, संपूर्ण देशासाठी ही जात प्रसारित करण्यात आलेली आहे. झुपक्याने येणाºया या लिंबाच्या झाडाला काटे नाहीत, तसेच फळात बिया नसल्याने लिंबू उत्पादक शेतकºयांची मागणी वाढली आहे.-डॉ. दिनेश पैठणकर, प्रमुख, अ.भा.स. संशोधन प्रकल्प (लिंबूवर्गीय फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.