- राजरत्न सिरसाट
अकोला : कृषी शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा आढावा दरवर्षी घेतला जातो. आता कृषी शिक्षणाचा आढावा घेतला जाणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यासाठीचे पाऊल उचलले आहे. येत्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालयांना प्रगती पुस्तक सादर करावे लागणार आहे. देशातील अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग मानला जात आहे.कृषी विद्यापीठांतर्गत विदर्भात शासकीय व खासगी मिळून विदर्भात ३६ कृषी महाविद्यालये आहेत. जैवतंत्रज्ञान या विषयासाठी पहिले शासकीय पदवी महाविद्यालय विदर्भाला मिळालेले आहे. उद्यानविद्या, वनविद्या, कृषी, अन्नशास्त्र, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकी,जैवतंत्रज्ञान या सर्व शाखांमध्ये पदवी ते आचार्यपर्यंत पदवी अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहे. दोन हजार पाचशेच्यावर विद्यार्थी दरवर्षी येथून विविध विषयांची पदवी ग्रहण करतात. वैद्यकीय, अभियांत्रिकीनंतर विद्यार्थीं कृषी अभ्यासक्रमाला पसंती देत असल्याने कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.सीईटी,नीटप्रमाणे आता कृषी पदवी,पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीही सीईटी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. म्हणूनच कृषी शिक्षणाचा दर्जा आणखी सुधारावा, असे प्रयत्न कृषी विद्यापीठाचे आहेत. दरवर्षी तीन दिवस हा आढावा घेण्यात येणार असून, कृषी महाविद्यालयातील प्रयोगशाळा, जागा, मैदानाची अवस्था तर तपासण्यात येईलच; गुणवत्ता यादी, किती विद्यार्थी भारतीय कृषी संशोधन परिषदेला नियुक्त झाले,किती विद्यार्थ्यांना फेलोशीप मिळाली, नोकरीला किती लागले, सद्यस्थिती काय आहे. याचे सादरीकरण महाविद्यालयाच्या प्राचार्यांना करावे लागणार आहे.राज्यात चार कृषी विद्यापीठे असून, चारही कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ दरवर्षी महत्त्वाचे बियाणे व इतर संशोधन तसेच शेतीपयोगी तंत्रज्ञान विकसित करीत असतात. यामध्ये यंत्राचासुद्धा समावेश असतो. यात काही संशोधन अनेक वर्षांनंतर यशस्वी होते. आपल्या नावावर संशोधन असावे म्हणून त्यासाठी शास्त्रज्ञ परिश्रम घेतात. विकसित केलेले हे संशोधन राज्यस्तरीय संशोधन समितीपुढे (ज्वॉइंट अॅग्रोस्को) मान्यतेसाठी मांडले. तत्पूर्वी कृषी विद्यापीठ स्तरावर संशोधनाचा आढावा घेतला जातो. नंतरच ते ज्वॉइंट अॅग्रोस्कोमध्ये पाठवले जाते. त्यासाठी शास्त्रज्ञांना त्यांनी केलेल्या संशोधनाचे सादरीकरण करावे लागते. याच धरतीवर विदर्भातील कृषी महाविद्यालयाचा आढावा घेतला जाणार आहे.
कृषी शिक्षणाला दर्जा आहे. यात आणखी सुधारणा व्हावी, स्पर्धा वाढून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा,यादृष्टीने दरवर्षी तीन दिवस कृषी महाविद्यालयाचा आढावा घेतला जाणार आहे.- डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.