लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भ कार्यक्षेत्र असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील पेरणी ते कर्मचार्यांचा होणारा खर्च तीन कोटींच्या घरात आहे; परंतु मागील एक महिन्यापासून कृषी विद्यापीठ रोजंदारी कर्मचार्यांचा संप सुरू असल्याने जवळपास सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकापेक्षा तण मोठे झाले असून, संपूर्ण कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील पीक मोकाट गुरांनी फस्त केले आहे.‘समान काम, समान वेतन’ या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी कर्मचार्यांच्या संपाला एक महिना झाला आहे. या संपामुळे कृषी विद्यापीठाची शेतीची कामे पूर्णत: ठप्प आहेत; परंतु अद्याप तोडगा निघाला नाही. या संपाची अद्याप दखल घेतली गेली नसल्याने कृषी विद्यापीठाच्या जवळपास अडीच हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. कर्मचार्यांच्या वेतनावर अडीच ते तीन कोटी रुपये वर्षाकाठी खर्च केले जातात तर दरवर्षीची प्रक्षेत्रातील शेतीची मशागत, कृषी निविष्ठा ते पेरणी, फवारणीचा जवळपास ७५ लाख ते एक कोटी रुपये खर्च होत असतो.यावर्षी सर्वच क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. तथापि, पेरणीच्या पंधरा दिवसनंतरच कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. एकही कर्मचारी कामावर नसल्याने उभी पिके गुरांनी फस्त केली आहेत. गुरांचा मुक्त संचार वाढल्याने ही गुरे थेट कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयापर्यंत पोहोचलेली दिसतात. मूग, उडिदाचे उभे पीक वाया गेले आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधित बीटी कापसाची यावर्षी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर चाचणी घेतली जात आहे. तथापि, याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने या पिकात तण वाढले असून, किडींचाही प्रादुर्भाव वाढला आहे. संपाचा फटका या कापसालाही बसला आहे.दरम्यान, एक महिना मजुरांचा संप चालावा हे आश्चर्य आहे. कृषी विद्यापीठाच्या अकोला येथील मुख्यालयी वेगवेगळ्य़ा पद्धतीने आंदोलन करू न कृषी विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अद्याप तोडगा न निघाल्याने इतर संशोधनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
जवळपास तीन कोटी रुपये दरवर्षी कर्मचार्यांच्या वेतनावर खर्च होतात तसेच खरीप हंगामातील पेरणी, कृषी निविष्ठा तसेच पिकांच्या मशागतीसाठी दरवर्षी एक कोटीच्यावर खर्च होतो. - डॉ.डी.एम. मानकर, संचालक संशोधन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.