अकोला: अकोल्याच्या शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ६0.६८ हेक्टर जमीन शासनाच्या नावे करण्यासाठी या जमिनीचा ७/१२ गुरुवारी शासनाच्या नावे करण्यात आला.शिवणी विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठाची आवश्यक असलेली ६0.६८ हेक्टर जमीन भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या ताब्यात देण्याचा आदेश शासनामार्फत जिल्हाधिकार्यांना देण्यात आला आहे. त्यानुषंगाने कृषी विद्यापीठाची जमीन शासनाच्या नावे करून, आणि या जमिनीचा सात-बारा शासनाच्या नावे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी उपजिल्हाधिकारी (विशेष भूसंपादन), अकोल्याचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले आहेत. त्यानुषंगाने महसूल विभागामार्फत कृषी विद्यापीठाच्या ६0.६८ हेक्टर जमिनीच्या ७/१२ मध्ये फेरफारची नोंद घेण्यात आली असून, विद्यापीठाच्या या जमिनीचा ७/१२ शासनाच्या नावे करण्यात आला. यासंबंधीचा अहवाल गुडधी येथील तलाठय़ामार्फत गुरुवारी अकोला तहसीलदारांकडे सादर करण्यात आला. तहसीलदारांकडून हा अहवाल शुक्रवारी जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात येणार आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी कृषी विद्यापीठाची शासनाच्या नावे करण्यात आलेली ही जमीन भारतीय विमानपत्तन प्राधिकरणच्या ताब्यात दिली जाणार आहे.
कृषी विद्यापीठाच्या जमिनीचा सात - बारा शासनाच्या नावे!
By admin | Published: October 02, 2015 2:21 AM