आकोट : आकोट कृषी विभागामार्फत शेतकर्यांना पेरणीकरिता देण्यात येणारे हरभरा बियाणे आकोट कृषिउत्पन्न बाजार समितीमधून तहसीलदारांनी १ डिसेंबर रोजी जप्त केले. तेल्हारा कृषी विभागामार्फत वितरित करण्यात आलेले हे बियाणे बाजार समितीत विक्रीकरिता आणले असल्याच्या संशयावरून बियाण्यासह वाहन आकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात उभे करण्यात आले आहे. आकोट बाजार समितीत कृषी विभागातील हरभरा बियाणे विक्रीकरिता आले असल्याची माहिती आकोट तहसीलदार प्रदीप पाटील यांना मिळाली होती. त्यांनी बाजार समितीत जाऊन एमएच ३0 एल ४३0४ या क्रमांकाच्या मालवाहू वाहनाची तपासणी केली. त्यामध्ये सोयाबीनसह महाबीजच्या हरभरा बियाण्याच्या बॅग आढळून आल्या. त्यामुळे त्यांनी आकोट येथील कृषी विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावूून खात्री करून घेतली. सदर बियाणे हे कृषी विभागाचे असून, ते शेतकर्यांना वितरित करण्यासाठी महामंडळाकडून आणले जाते. त्यामुळे हे बियाणे बाजार समितीत विक्रीकरिता आणले असावे, या संशयावरून तहसीलदार पाटील यांनी वाहन आकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात उभे केले. याबाबत तेल्हाराचे तहसीलदार सचिन पाटील यांना माहिती देण्यात आली. तेल्हारा तालुका कृषी अधिकारी आगरकर यांनी पंचनामा करून बियाणे ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर हरभरा बियाणे हे तेल्हारा तालुक्यातील सिरसोली या भागातील आहे.
कृषी विभागाचे हरभरा बियाणे बाजार समितीतून जप्त!
By admin | Published: December 02, 2015 2:48 AM