अकोला : कोरोना काळात गर्दी कमी करून संसर्ग टाळणे अत्यंत आवश्यक आहे; मात्र खरीप हंगाम समोर असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर खते-बियाणे उपलब्ध करून देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. याकरिता कृषी सेवा केंद्रांसोबत जुळलेल्या शेतकऱ्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून बांधावर बियाणे-खते पोहोचविण्याचे काम सुरू आहे. कृषी सहायकांनी जिल्ह्यात ४४० ग्रुप तयार केले असून ३५ हजार ४७० शेतकऱ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी केंद्रामध्ये न जाता कृषी निविष्ठा बांधावर मिळत आहे.मागील सव्वा वर्षांपासून कोरोना संकट वाढत आहे. त्यामुळे वेळोवेळी लॉकडाऊन, संचारबंदीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांवर खरीप हंगाम आला आहे. शेतकऱ्यांकडून बी-बियाणांची खरेदी सुरू झाली आहे. यादरम्यान कृषी सेवा केंद्रांवर होणारी गर्दी पाहता कृषी विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे पोहोचविण्याचे काम सुरू आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कृषी सहायकांनी हे ग्रुप तयार केले असून या ग्रुपचे ॲडमिनही ते स्वत:च आहे. या ग्रुपमध्ये कृषी सेवा केंद्राचे मालक व त्या केंद्रासोबत वर्षानुवर्षापासून जुळलेले शेतकरी सहभागी आहे. यामध्ये कृषी सहायक समन्वय करत आहे.
ग्रुपवर नोंदवावी लागेल मागणी
शेतकऱ्यांना आपल्या नावासह लागणारे बियाणे आणि खतांची मागणी व्हॉट्सॲप ग्रुपवर नोंदवावी लागणार आहे. कृषी सेवा केंद्राचे मालक नोंदविलेल्या मालाची रक्कम आणि एकत्रितपणे वाहतुकीसाठी लागणाऱ्या खतांची माहिती ग्रुपवर देतील.
रक्कमही पाठवावी लागेल ऑनलाईन
मागणी नोंदविल्यानंतर शेतकऱ्यांनी निविष्ठांची रक्कम ऑनलाईन पाठवायची आहे. पैसे मिळाल्यानंतर कृषी सेवा केंद्राचे मालक मागणीनुसार खते-बियाणे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोच करतील.
असा होणार फायदा
अशा प्रकारे उपक्रम राबविल्यास दुकानात गर्दी होणार नाही. परिणामी, कोरोना संसर्ग टाळता येतो.
किमतीपेक्षा जास्त दराने विक्री होणार नाही. तसेच लिकिंग करता येणार नाही.
शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही व इतर निविष्ठांचे क्षेत्रनिहाय सूक्ष्म नियोजन करता येईल.
शेतकऱ्यांना वेळेत बांधापर्यंत खते-बियाणे मिळणार असल्याने त्यांच्या वेळ व खर्चात बचत होईल आणि पेरणी वेळेवर करणे सोईचे हाईल.
तालुकानिहाय व्हॉट्सॲप ग्रुप
तालुका ग्रुप
अकोला ११०
बार्शीटाकळी ५५
मूर्तिजापूर २५
अकोट ९०
तेल्हारा ३५
बाळापूर ९३
पातूर ३२
व्हॉट्सॲप ग्रुपव्दारे शेतकऱ्यांकडून मागणी नोंदविणे सुरू आहे. प्राप्त मागणीप्रमाणे निविष्ठा पोहोचविण्याचे काम सुरू झाले. तसेच ग्रुपव्दारे इतर विस्ताराचे कामही सुरू आहे.
- डॉ. कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी