अकोला: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत येणारे कृषी पदवी अभ्यासक्रम (बीएससी अॅग्री) व्यावसायिक आहे; परंतु शैक्षणिक वर्ष २०१८ -२०१९ या कृषी पदव्युत्तर आचार्य पदवी प्रवेश माहिती पुस्तिकानुसार कृषी पदव्युत्तर व आचार्य पदवी व्यावसायिक म्हणून घोषित केले नाहीत. हे अभ्यासक्रम व्यावसायिक करण्यासाठी शुक्रवारी अभाविपने कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे केली.शुक्रवारी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे हे कृषी विद्यापीठामध्ये आयोजित कार्यक्रमासाठी आले असता, अभाविपच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले. यावेळी कुलगुरू डॉ. विलास भाले उपस्थित होते. कृषी पदव्युत्तर आचार्य पदवी प्रवेश माहिती पुस्तिकानुसार कृषी पदव्युत्तर व आचार्य पदवी व्यावसायिक म्हणून घोषित केले नसल्यामुळे शैक्षणिक सवलती/शिष्यवृत्ती/शैक्षणिक शुल्कार्धी प्रतिपूर्तीच्या सवलती कृषी विद्यापीठ अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. त्यामुळे सन २०१८-२०१९ च्या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. गतवर्षातील दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता, शेकडो विद्यार्थी हे अल्पभूधारक शेतकरी व आर्थिक दुर्बल घटकातील आहेत. शासनाने प्रलंबित असलेल्या व्यावसायिक कृषी अभ्यासक्रमाचा प्रश्नाचा विचार करून विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रवेश प्रक्रियेत काही दिवसाची सूट देण्यात आली. याबद्दल अभाविपने स्वागत केले. व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती/शिष्यवृत्ती/शैक्षणिक शुल्कार्धी प्रतिपूर्ती देण्यात येते. त्यामुळे कृषी पदव्युत्तर व आचार्य पदवी व्यावसायिक म्हणून घोषित करण्याची मागणी अभाविपने केली आहे. शासनाने या विषयावर योग्य ती कारवाई न केल्यास अभाविपतर्फे शासनाविरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी प्रदेश सहमंत्री विशाल राठोड यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)