अकाेला: बाळापूर व पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांची हाेणारी गैरसाेय लक्षात घेता राज्य शासनाने सदर दाेन्ही तालुके अकाेला येथील उपविभागीय कृषी कार्यालयात जाेडण्याचे निर्देश शुक्रवारी जारी केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे उपराेक्त दाेन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना अकाेट येथील कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध याेजना राबविल्या जातात. त्यासाठी जिल्ह्यात दाेन तालुक्यांसाठी एका कृषी कार्यालयाचे गठन करण्यात आले असून त्याद्वारे कारभार केला जात आहे. दरम्यान, अकाेट येथील उपविभागीय कृषी कार्यालयामार्फतच तेल्हारा, अकाेटसह पातूर व बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कामकाज निकाली काढण्याचा प्रयत्न केला जात हाेता. बाळापूर किंवा पातूर येथे कृषी अधिकारी कार्यालय असणे अपेक्षित असताना या दाेन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयक समस्या किंवा याेजनांची माहिती घेण्यासाठी ८० किलाेमीटरपेक्षा अधिक अंतराची पायपीट करावी लागत हाेती. त्यामुळे अकाेट येथील कृषी कार्यालयाचे बाळापूर किंवा पातूर येथे स्थानांतरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली हाेती. यासंदर्भात सेना आमदार नितीन देशमुख यांनी कृषिमंत्री दादाराव भुसे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला़ शेतकऱ्यांची गैरसाेय पाहता कृषिमंत्र्यांनी बाळापूर व पातूर तालुका अकाेला येथील उपविभागीय कृषी कार्यालयात जाेडण्याचा आदेश जारी केला. यासंदर्भात शासनाने शुक्रवारी निर्देश जारी केले.
शेतकऱ्यांना माेठा दिलासा
बाळापूर व पातूर येथील शेतकऱ्यांना चक्क अकाेट येथील उपविभागीय कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत हाेते. प्रवासाचे अंतर लक्षात घेता शेतकऱ्यांनी या कार्यालयाकडे पाठ फिरवली हाेती. शासनाच्या निर्णयामुळे या दाेन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे.
बाळापूर व पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अकाेट येथील कृषी कार्यालयात जाणे अशक्य झाले हाेते. त्यामुळे त्यांना शासनाच्या अनेक याेजनांपासून वंचित राहावे लागत हाेते. यासंदर्भात कृषिमंत्री दादाराव भुसे यांच्याकडे पाठपुरावा केला. यापुढे शेतकऱ्यांना विविध याेजनांचा लाभ घेता येणार आहे.
-आमदार नितीन देशमुख, शिवसेना