अकोला: लहान मुलांचे दात बळकट करायचे किंवा सर्वांच्याच पोटाचे विकार बरे करायचे असतील तर त्यावर डिकामली हे रामबाण औषध. अँलोपॅथीच्या जमान्यात आजही ग्रामीण, अतिदुर्गम भागात डिकामलीचा वापर होतोय तो औषध म्हणूनच. जुलै महिन्यात दिसणारे याच डिकामलीचे झाड पांढर्या फुलांनी बहरले असून, या झाडाचे दर्शन आपणास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर बघायला मिळते.या कृषी विद्यापीठाच्या शेळी, मेंढी संगोपन प्रकल्पांतर्गत एका कडेला एकाच जातीची ओळीने १५,१६ झाडे आहेत. वर्षाऋतू सोडला तर या झाडांकडे कोणी ढुंकून पाहत नाही; पण जूनच्या अखेरीस आणि जुलै महिन्याच्या प्रारंभी ही झाडे शुभ्र फुलांनी बहरतात आणि तेथून जाणार्यांचे लक्ष वेधतात, तसेच या फुलांचा मादक सुगंध प्रात:काळी फेरफटका मारणार्यांना धुंद करतो. सध्या ही झाडे अशीच मस्त बहरली आहेत. त्यांची ओळख करून घेतल्यानंतर त्यांचे मनोगत मनाला आनंददायी, सुखद आणि वेड लावणारे आहे.डिकामली निसर्गत: डोंगराळ भागात आढळते. १५ ते १६ फुटांचे उंच हे झाड वाढते. आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदाचा अभ्यास करू न डिकामली मानवाच्या किती उपयोगी आहे, हे सांगितलेले आहे.पोटदुखीवर रामबाण उपाय!माणसाला जिभेचे चोचले पुरविताना खायचे भान राहात नाही. मग अजीर्ण, कृमी, जंत, असे अनेक पोटाचे विकार होतात. त्यासाठी डिकामलीच्या खोडातून येणारा, कोवळ्य़ा पानातून स्रवणारा तीव्रगंधी डिंक जर सेवन केला तर पोटदुखी व तत्सम आजारात आराम पडतो, तसेच तोंडल्यासारखी फळेही या झाडापासून मिळतात. त्यातून पिवळ्य़ा रंगाचा चीक येतो. तो वाळवून लहान मुलांच्या हिरड्यांना लावल्यास बाळाचे दात बळकट होतात.
कृषी विद्यापीठाच्या परिसरात बहरली डिकामली!
By admin | Published: July 18, 2016 2:07 AM