अकोला: कृषि विद्यापीठ कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग आणि सुधारीत आश्वासीत प्रगती योजना त्वरीत लागू व्हावा, या मागणीसाठी मंगळवार २७ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. आंदोलनामध्ये राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार असल्याची माहिती, कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. संजय कोकाटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील कृषी विद्यापीठ वगळल्यास इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. हा कृषी विद्यापी कर्मचाऱ्यांवर अन्याय असल्याचे सांगत राज्यातील चारही कृषी विद्यापीठ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतल्याची माहिती त्यांनी सोमवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कमेटी सभागृहात पत्रकार परीषदेत सांगितले. शासनाचे लक्ष वेधण्याकरीता मंगळवारपासून राज्यातील चारही विद्यापीठात अधिकारी, कर्मचारी काळ्या फिती लाऊन कामकाज करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर २ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत लेखनी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतरही शासनाने मागण्या मान्य न केल्यास ६ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय सामुहिक रजा आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ७ नोव्हेंबर पासून बेमुदत लेखनी बंद आंदोलन करणार असल्याचे डॉ. कोकाटे यांनी सांगितले. यावेळी कार्याधक्ष्य संतोष राऊत, सदस्य शिवाजी नागपूरे, डॉ. वनिता खोबरकर, अनिता वसू, गजानन होगे आदिंची उपस्थिती होती.
७ व्या वेतन आयोगासाठी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 4:22 PM