लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण आणि कृषी क्रांतीचे प्रणेते स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री स्व. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन (अँग्रोटेक २0१७) चे आयोजन विद्यापीठ क्रीडांगण येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते २७ डिसेंबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता संपन्न होईल.याप्रसंगी राज्याचे गृहराज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती राहील. तसेच अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या वाघोडे, महापौर विजय अग्रवाल, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आ.डॉ. संजय रायमुलकर, आ. अमित झनक, आ. गोवर्धन शर्मा, आ. श्रीकांत देशपांडे, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ. बळीराम सिरस्कार, जिल्हा परिषद कृषी सभापती माधुरी गावंडे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य गोपी ठाकरे, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. चारुदत्त मायी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांचीसुद्धा उपस्थिती राहील. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणार्या सोहळ्यात प्रदर्शनाचे उद्घाटन सोबतच संवादिनी-२0१८ चे विमोचनसुद्धा होणार आहे.
कीड, रोग नियंत्रणावर चर्चासत्र उद्घाटनानंतर दुपारी २.३0 वाजता प्रतिभा साहित्यिक संघाचे अध्यक्ष विठ्ठल कुलट हे कृषीविषयक काव्यपर प्रबोधन करणार आहेत, तर दुपारी ३.३0 वाजता कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत आयोजित चर्चासत्रात कापूस, तूर व हरभरा पिकांमधील कीड व रोग नियंत्रण तसेच पीक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, या ज्वलंत विषयावर कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे मार्गदर्शन करणार आहेत. तीनही दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी १0 ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.