अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, प्रकल्प संचालक, आत्मा आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या क्रीडांगणावर २७ डिसेंबरपासून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन सुरू आहे. यामध्ये कृषी विज्ञान केंद्राने संशोधित केलेली अवजारे, यंत्रे व विविध प्रतिकृती लक्षवेधी ठरल्या आहेत.यवतमाळ व बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्राने शाश्वत शेतीस अनुसरून शेतीपूरक व्यवसायास चालना देणाऱ्या प्रतिकृतीची सुंदर मांडणी केली आहे. सोनापूर (गडचिरोली) येथील कृषी विज्ञान केंद्राने हस्तचलित धान रोवणी यंत्राची प्रतिकृती दालनात ठेवली आहे. याच केंद्राद्वारे पुनर्विनीकरण पाणी प्रणालीवर आधारित मत्स्य शेतीचे जिवंत प्रात्यक्षिक माहितीसह ठेवले आहे. सिंदेवाही (चंद्रपूर) येथील कृषी विज्ञान केंद्राने जतन करून ठेवलेल्या स्थानिक व औषधे गुणधर्माने युक्त असलेल्या विविध फळे व भाजीपाला पिकांचे नमुने दालनात मांडले आहेत. येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राद्वारे संशोधित भात पिकाच्या विविध जातींची जिवंत नमुने शेतकºयांच्या माहितीस्तव दालनात मांडले आहेत. या संशोधन केंद्राद्वारे प्रसारित पीकेव्ही तिलक हा नवीन संशोधित वाण या दालनांचा केंद्रबिंदू ठरला आहे. कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा (वर्धा)च्या दालनात रेशीम शेती, धिंगरी अलिम्बी उत्पादन, अझोला व हिरवळीची खते निर्मिती तंत्र, गांडूळ खत उत्पादन तसेच भाजीपाला व फळ पिकांच्या मूल्यवर्धन प्रक्रिया तंत्रज्ञान अशा विविध शेतीपूरक उद्योगाविषयी प्रात्यक्षिकांच्या आधारे माहिती दिल्या जात आहे. गहू संशोधन केंद्राद्वारे संशोधित गहू पिकाच्या एकेएडब्ल्यू-४६२७, एकेएडब्ल्यू-३७२२ तसेच नवीन वाण डब्ल्यूएसएमझ्र १४७२ या कमी पाण्यात परिपक्व होणाºया वाणांचे जिवंत नमुने प्रदर्शनस्थळी मांडले आहेत.उद्यानविद्या विद्याशाखेमार्फत ठेवण्यात आलेल्या शेवंतीच्या विविध जाती, भाजीपाला पिकांच्या अनेक वाणांचे नमुने प्रदर्शनस्थळी मांडले आहेत. यामध्ये हळदीचे पीकेव्ही वायगाव, एकेएलबी ९ वांगी या नवीन वाणांचे नमुने उपलब्ध केलेले आहेत. फळशास्त्र विभागाद्वारे उत्पादित विविध फळ पिकांची रोपे यामध्ये आंब्याची केशर, आम्रपाली, मल्लिका पेरूची सरदार, डाळिंबाची भगवा, सीताफळाची बालानगर, चिकूची कालीपत्ती इ. जाती शेतकºयांच्या माहिती व विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. सीताफळ उत्पादक संघ अंतर्गत येत असलेल्या जानेफळ शेतकरी उत्पादक कंपनी मर्या. ता. मेहकर. जि. बुलडाणा यांनी तयार केलेल्या सीताफळ कुल्फीस तसेच कृषी महाविद्यालय, अकोला यांच्या ज्युसच्या दालनासही अनेकांनी भेट देऊन माहिती घेतली.