अकोला : काही वर्षांपूर्वी शेतीसाठी गोधनाचा उपयोग व्हायचा; परंतु आता त्याची जागा यंत्राने घेतली आहे. उन्नत शेती आणि आर्थिक परिस्थिती बळकट करायची असेल, तर शेतकºयांना शेतीपूरक व्यवसाय करणे आवश्यक आहे, तरच शेतकºयांचे भविष्य असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत आयोजित पाच दिवसीय अॅग्रोटेक कृषी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास भाले होते. याप्रसंगी मनपा आयुक्त संजय कापडणीस, याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता अभियांत्रिकी डॉ. महेंद्र नागदेवे, निम्न कृषी शिक्षण विभागाचे अधिष्ठाता डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, कुलसचिव, डॉ. प्रकाश कडू, प्रकल्प संचालक, आत्मा राजेंद्र निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रदीप बोरकर यांनी केले. आभार विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी मानले.अॅग्रोटेकच्या निमित्ताने नव्या संशोधनाची ओळखअॅग्रोटेकच्या माध्यमातून कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नव्या शेती तंत्रज्ञानाची ओळख शेतकºयांना करून देता आली. शिवाय, या तंत्रज्ञानाला व्यवसायाची सांगड कशी घालावी, यासंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहितीदेखील यावेळी कुलगुरू डॉ. भाले यांनी अध्यक्षीय भाषणातून दिली.उन्नत शेतीसाठी कृषी प्रदर्शनाची गरजभविष्यातील उन्नत शेती व्यवसायासाठी अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनाची गरज असल्याचे प्रतिपादन अकोला महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी केले.विविध स्पर्धांमध्ये विजेत्यांचा सत्कारशासकीय गटामध्ये प्रथम क्रमांक जिल्हा रेशीम कार्यालय, द्वितीय क्रमांक सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), तृतीय क्रमांक जिल्हा पशुसंवर्धन विभागाला मिळाला. निमशासकीय गटात प्रथम उद्यानविद्या विभाग, द्वितीय कीटकशास्त्र विभाग आणि तृतीय मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाने पटकावला. कृषी विज्ञान केंद्र गटात प्रथम कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, द्वितीय कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली आणि तृतीय कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी पटकावला. स्वयं साहाय्यता बचत गटात दुर्गामाता स्वयं साहाय्यता बचत गट, सिद्धार्थ महिला स्वयं साहाय्यता बचत गट, ग्रामविकास स्वयं साहाय्यता बचत गट यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला.