अकोला : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा मुकाबला करून आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी सक्षमपणे परिस्थिती हाताळली असून, संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवून सज्जता करायची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना केले.
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या कस्तुरबा सभागृहात आयोजित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. श्याम शिरसाम, डॉ. आरती कुलवाल, डॉ. दिनेश नैताम, डॉ. संगीता साने, डॉ. पटोकार आदी उपस्थित होते. कोरोना काळातही शासनाच्या कुटुंब कल्याण योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना यावेळी जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच कोरोनायोद्धा म्हणून सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून प्राथमिक आरोग्य स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठरविले आहे. त्यादृष्टीने काम सुरू झाले आहे असून, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आरोग्य कर्मचाऱ्यांनी फार मोठं काम केलं आहे, असे सांगत आता स्थिती सुधारत असली तरी उसंत न घेता संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सज्जता करावी लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असून, त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सज्जता करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही सज्जता करतानाच अधिकाधिक लोकांचे कोविड लसीकरण करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी केले. जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व व त्याअनुषंगाने कुटुंब कल्याण योजनांच्या अंमलबजावणीचे महत्त्व त्यांनी विषद केले.
कुटुंब कल्याण कार्यक्रमात आरोग्य
कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण : सीइओ
कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविताना ग्रामीण स्तरावर समुपदेशन अधिक महत्त्वाचे असून, त्यासाठी आरोग्य कर्मचारी हे महत्त्वाची भूमिका बजावतात, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सौरभ कटियार यांनी यावेळी सांगितले.
...........................फोटो..........................