अकोला : रेबिज या प्राणघातक रोगास सर्वांचे सहकार्य आणि लसीकरणातून २०३० या वर्षापर्यंत संपवू शकतो, असा विश्वास सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने यांनी व्यक्त केला.जागतिक रेबिज दिनाच्या औचित्याने स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला आणि पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी यांच्यातर्फे एक दिवसीय आॅनलाइन आंतरराष्ट्रीय वेबिनार पार पडला. यामध्ये डॉ. भिकाने बोलत होते. कार्यक्रमाचे उद््घाटक म्हणून करुणानिधी यांचा सहभाग होता. रेबिजबद्दल जनजागृती असणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी उद्घाटनपर भाषणातून सांगितले. प्रा. डॉ. भिकाने यांनी आपल्या व्याख्यानात रेबिज या रोगाचा इतिहास, स्रोत, संक्रमण मार्ग, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना इत्यादी अनेक बाबींची माहिती दिली. या आंतरराष्ट्रीय व्याख्यानास भारतासह जगभरातून सुमारे ६५० विद्यार्थी, प्राध्यापक, पशुवैद्यकीय अधिकारी, व्यावसायिक आदींची उपस्थिती होती. व्याख्यानाचे संयोजक पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथील सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. नितीन मार्केंडेय होते. त्यांनी समारोपीय भाषणात डॉ. भिकाने यांचे अभिनंदन केले, तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथील संचालक विस्तार शिक्षण, प्रा. डॉ. व्ही. डी. आहेर यांनी या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन समन्वयक डॉ. प्रवीण बनकर यांनी तर आभार डॉ. महेश इंगवले आणि डॉ. संतोष शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. किशोर पजई तसेच परभणी येथील डॉ. सय्यद मुजीब, डॉ. सिद्दीकी व डॉ. एस. व्ही. गायकवाड यांनी परिश्रम घेतले.