प्रशांत विखे
तेल्हारा : शहरातील देवानंद सुरेश तेलगोटे याने आयआयटी उत्तीर्ण होऊन यूपीएससीच्या परीक्षेकडे वळला. यूपीएससीची परीक्षा कठीण असूनही कठोर परिश्रमाच्या जोरावर त्याने परीक्षा उत्तीर्ण केली व मुलाखतीसाठी पात्र ठरला. मात्र अशातच देवानंदला कोरोनाने गाठले. देवानंदला सर्वप्रथम अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र ८० टक्के फुफ्फुस निकामी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी एअर ॲम्ब्युलन्सने शनिवारी हैदराबाद येथे हलविले. उपचारासाठी लागणारा खर्चासाठी मित्रांनी पुढाकार घेत एक कोटी रुपयांची मदत ट्रान्स्फर केली.
देवानंदचे वडील सुरेश तेलगोटे हे भारतीय सैन्यामधून सेवानिवृत्त झाले आहेत. मुलगा देवानंद हुशार असल्याने त्याला मुंबई येथील नामांकित आयआयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तेथून त्याने केमिकल इंजिनिअरिंग उत्तीर्ण केले. त्यावेळी त्याच्या अनेक मित्रांनी जगातील विविध कंपन्यांमध्ये नोकरी स्वीकारली; मात्र देवानंदने आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले. देवानंदने कठोर परिश्रम घेऊन स्वप्न सत्यामध्ये उतरवीत यूपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली व मुलाखतीसाठी पात्र ठरला. मुलाखत देण्यासाठी तो दिल्ली येथे जाण्यापूर्वीच त्याला कोरोनाने गाठले.
---------------------------
देवदूत म्हणून मित्र आले धावून, एक कोटी रुपये केले जमा
देवानंदची घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्याला अकोला येथील खासगी रुग्णालयात भरती केल्यानंतर जवळपास तीन ते चार लाख रुपये खर्च केला; मात्र देवानंदचे फुफ्फुस हे ८० टक्के निकामी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी हैदराबाद येथे नेण्यासाठी जवळपास एक कोटी खर्च असल्याने नातेवाईक हतबल झाले होते. त्यानंतर त्याचा मित्र सुमित कोठे याने देवानंदच्या तब्येत व परिस्थितीची जाणीव मित्रांना करून दिल्यानंतर मित्राच्या हाकेला प्रतिसाद देत जगभरातून त्याच्या मित्राचा मदतीचा ओघ सुरू झाला. मित्रांनी जवळपास एक कोटी रुपये जमा केले.
-----------------------------------
संध्याकाळी पोहोचली एअर ॲम्ब्युलन्स
उपचारासाठी पैसे जमा झाल्यानंतर देवानंदच्या नातेवाईकांनी हैदराबाद येथील डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधला. शनिवारी सायंकाळी अकोला विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्स दाखल झाली. सर्वप्रकारची पूर्वतयारी करून देवानंदला हैदराबाद येथे हलविण्यात आले.
----------------------
रक्ताच्या नात्यालाही मैत्रीने टाकले मागे
आजच्या काळात कोणी कोणाचे नाही, अशी जरी समाजाची भावना झाली असली; मात्र देवानंदच्या मित्रांनी इतकी मोठी रक्कम क्षणाचाही विलंब न लावता जमा केली. त्याच्या या मैत्रीने रक्ताच्या नात्यालाही मागे टाकले.