अकोला, दि. २- शहराचे तापमान ४४ अंशापर्यंंंत तापत असल्याने, उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असताना, सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात मात्र सर्व नऊ वातानुकूलन यंत्र बंद आहेत. हे यंत्र केवळ भिंतीच्या शोभा वाढवित असून, रुग्ण उकाड्याने त्रस्त होत आहेत. गत काही दिवसांपासून शहरात रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होत आहे. ४४ डिग्री सेल्सिअसपर्यंंत पारा पोहोचला असून, प्रचंड तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी नागरिक थंडपेयांचा आधार घेत आहेत. वातानुकूलन यंत्र आणि कूलर लावलेल्या ठिकाणी नागरिक विसावा घेत आहेत; परंतु सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात लावलेले वातानुकूलन यंत्र प्रचंड तापमानातही बंद आहेत. रुग्णांच्या सोयीसाठी लावलेले वातानुकूलन यंत्र सुरू करण्याबाबत प्रशासन गंभीर दिसत नाही. गंभीर आजारी रुग्णांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात हलविण्यात येते. या ठिकाणी १२ खाटा असून, सभागृहात नऊ वातानुकूलन यंत्र लावलेले आहेत; परंतु यापैकी एकही वातानुकूलन यंत्र काम करीत नसल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे. तापमान वाढत असल्याने, रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या सोयीसाठी वातानुकूलन यंत्र आणि कूलर सुरू करायला हवे होते; परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णांना उकाड्यात उपचार घ्यावे लागत आहेत. उकाड्याचा रुग्णांना त्रास होत असतानाही रुग्णालय प्रशासन ढिम्म आहे. अतिदक्षता कक्षातील लावलेले वातानुकूलन यंत्र भिंतीची शोभा वाढवित आहेत. रुग्ण यंत्र सुरू करण्याची मागणी करतात, तेव्हा रुग्णालयाकडून यंत्र बंद असल्याचे सांगण्यात येते. अतिदक्षता कक्षातीलच रुग्णांची हेळसांड होत आहे. इतर वॉर्डांंंची परिस्थितीही काही वेगळी नाही. जळीत कक्षातील वातानुकूलन यंत्र बंदसर्वोपचार रुग्णालयातील जळीत कक्षातील रुग्णांसाठीसुद्धा वातानुकूलन यंत्र लावलेले आहेत. या कक्षात दररोज भाजलेले रुग्ण भरती होतात. त्यांच्या शरीरासाठी थंड वातावरण आवश्यक आहे. असे असतानाही जळीत कक्षातील वातानुकूलन यंत्र बंद आहेत. त्यामुळे या ठिकाणी दोन कूलर लावण्यात आले आहेत. कूलर भंगारातगतवर्षी सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांसाठी प्रशासनाने ३0 नवीन कूलर खरेदी केले होते; परंतु हे सर्व कूलर रुग्णालयातील कानाकोपर्यांमध्ये धूळ खात पडून आहेत. काही कूलरची मोडतोड झाली आहे. काही कूलर नादुरुस्त आहेत. एवढेच नाही, तर रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना पाणी पिण्यासाठी वॉटर कूलरसुद्धा अतिदक्षता कक्षात लावलेला आहे; परंतु हा वॉटर कूलरसुद्धा बंद आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. अतिदक्षता कक्षासोबतच वॉर्डांंंमधील बंद असलेले वातानुकूलन यंत्र दुरुस्तीसाठी सार्वजनिक विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. काही वॉर्डांंंमध्ये कूलरसुद्धा लावण्यात आले आहेत. अतिदक्षता विभागातील वातानुकू लन यंत्र लवकरच दुरुस्त करून सुरू करण्यात येतील. - डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.
४४ अंश तापमानातही वातानुकूलन यंत्र बंद!
By admin | Published: April 03, 2017 2:57 AM