अकोला : महापालिकेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर यांच्या भरधाव कारचा सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील वाशिम बायपास रोडवर भीषण अपघात झाला. यामध्ये रस्त्याने शतपावली करणाऱ्या दोघा भावंडांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा भाऊ गंभीररीत्या जखमी झाला. अपघातामध्ये अभियंता गुजरसुद्धा गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेतील कार्यकारी अभियंता अजय गुजर हे पातूरकडून एमएच-३०-एल-८०३३ कारने शहराकडे येत होते. दरम्यान, वाशिम बायपास चौक परिसरातील गंगा नगरात राहणारे मोहम्मद रफीक मोहम्मद हारुण आणि मोहम्मद अराफत मोहम्मद हारुण, बिलाल मजीद दोसाने हे तिघे जेवण आटोपल्यानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडले. रस्त्यावर फिरत असताना अजय गुजर यांच्या भरधाव कारने तिघांपैकी दोघांना जबर धडक दिली. यात मोहम्मद रफिक यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोहम्मद अराफत मोहम्मद हारुण हे गंभीर जखमी झाले. मनपाचे अभियंता अजय गुजर हे त्यांच्या फार्म हाउसवरून शहराकडे कारने येत होते. वाशिम बायपासनजीक रस्त्यावरील दुभाजकावरून त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरून चालणाऱ्या दोघा भावांवर जाऊन धडकली. अपघाताची माहिती परिसरातील नागरिकांना कळताच, त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली आणि जखमींना सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. अपघातामध्ये अभियंता अजय गुजर हेसुद्धा गंभीर जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. बिलाल मजीद यांच्या तक्रारीनुसार जुने शहर पोलिसांनी अजय गुजर याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. आयुक्त लहाने यांची रुग्णालयात धाव मनपाचे अभियंता अजय गुजर यांच्या कारचा अपघात झाल्याचे कळताच, मनपाचे आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके, डॉ. शैलेश देशमुख, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, नगरसेवक विजय इंगळे, अजय शर्मा यांनी सर्वोपचार रुग्णालयात सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास धाव घेतली. गुजर यांची गंभीर प्रकृती पाहता, उपस्थितांनी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला.
अजय गुजर यांच्या कारचा अपघात
By admin | Published: May 03, 2017 1:19 AM