लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका आयुक्त अजय लहाने यांची अखेर यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचा आदेश नगर विकास विभागाने १0 ऑगस्ट रोजी जारी केला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये कार्यरत उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ हे महापालिकेचे नवे आयुक्त असतील. १२ सप्टेंबर २0१५ रोजी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारलेल्या अजय लहाने यांनी, प्रशासकीय यंत्रणा मजबूत करण्यासाठी मनपातील रिक्त पदांवर सक्षम अधिकार्यांची नियुक्ती व्हावी, यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. परिणामस्वरूप सर्व रिक्त पदांवर शासनाने अधिकार्यांच्या नियुक्त्या केल्या. कामचुकार कर्मचार्यांना वठणीवर आणत त्यांनी प्रशासकीय कामकाज सुधारण्यासाठी आकृतीबंध, बिंदू नामावली आदींसारख्या क्लिष्ट मुद्यांना हात लावला. थकीत वेतनाची समस्या लक्षात घेऊन जीपीएस प्रणालीद्वारे शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून सुधारित कर लागू केला. राज्य सरकारने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अकोला शहराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर लहाने यांनी प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण करुन शहरात एलईडी पथदिवे लावण्याच्या कामाला गती दिली. त्यांच्या कार्यकाळात घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी १२५ घंटा गाड्यांची यंत्रणा कार्यान्वित झाली. कचरा गोळा करण्यासाठी खुप खर्च होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, लहाने यांच्या पुढाकाराने १६ ट्रॅक्टरची खरेदी करण्यात आली. सिटी बस सेवेचा क रारनामा मनपाच्या हिताचा करून बस सेवा सुरू करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्या बदलीची चर्चा सुरु होती. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचीही तयारी चालविली होती. अशातच शुक्रवारी अचानक त्यांच्या बदलीचा आदेश येऊन थडकला. आयुक्त पदाचा प्रभार तूर्तास जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
उपायुक्तांच्या बदलीची चर्चा!मनपातील उपायुक्त समाधान सोळंके यांचीही बदली झाल्याची चर्चा रंगली होती. तसा प्रस्ताव सोळंके यांनी आयुक्तांकडे सादर केल्याची माहिती आहे; मात्र, आयुक्तांच्या बदलीमुळे सोळंके यांच्या बदलीची शक्यता धूसर झाली आहे.
रस्ता रुंदीकरणाला चालना अजय लहाने शहरातील प्रमुख रस्ते प्रशस्त असावेत यासाठी आग्रही होते. शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रकाशित होऊन, कामांचे वर्कऑर्डर दिल्यानंतरही, रस्त्यांचे ‘वर्किंग एस्टिमेट’ बदलण्याचे धाडस त्यांनी केले. अवघ्या १८ ते २0 फूट रुंदीचे रस्ते त्यांच्या आग्रहामुळे ३५ ते ४0 फूट रुंद झाले.
यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदस्थापनेवर बदली झाली आहे. पाणीपुरवठय़ाच्या कामांसह रस्ते विकासाची कामे पूर्ण करायची होती. सुधारित कर प्रणालीमुळे कर्मचार्यांच्या थकीत वेतनाची समस्या निकाली निघेल, ही अपेक्षा आहे.- अजय लहाने, आयुक्त, मनपा
मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचे समजले; मात्र अद्याप नगर विकास विभागाकडून कार्यमुक्त केल्याचा आदेश मिळालेला नाही. - जितेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी ‘एमएमआरडीए’