अकाेला: राज्य शासनाकडून प्राप्त झालेले एलबीटीचे ६ काेटी २५ लाखांचे अनुदान व मालमत्ता कर वसुली विभागाने वसूल केलेल्या सव्वासात काेटींच्या रुपयांच्या बळावर गुरुवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी १३ काेटी ४० लाख रुपयांचे वेतन अदा करीत कर्मचाऱ्यांची दिवाळी गाेड केली.
उत्पन्नाचा प्रमुख स्रोत बळकट नसल्याने २०१७ पर्यंत मनपा कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची समस्या कायम हाेती. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे चक्क पाच ते सहा महिन्यांचे वेतन थकीत राहत हाेते. २०१७ नंतर हा अनुशेष दूर झाला. दिवाळीच्या ताेंडावर कमर्चाऱ्यांना हक्काचे वेतन मिळावे, यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस प्रयत्नरत हाेते. यादरम्यान, मनपाला राज्य शासनाकडून एलबीटीच्या अनुदानापाेटी प्राप्त झालेल्या ६ काेटी २५ लाख रुपयांमुळे चांगलाच धीर मिळाला. आयुक्त कापडणीस यांनी गुरुवारी १३ काेटी ४० लाख रुपयातून विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच मानधन अदा केले. यामधूनच सहाव्या वेतन आयाेगातील फरकाची ६ काेटींची रक्कमही अदा करणयात येऊन कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये देणयात आले. आयुक्तांच्या सकारात्मक भूमिकेमुळे मनपा कर्मचाऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
काेराेनानंतर उत्पन्नावर काय फरक पडला
शहरात मार्च महिन्यात काराेना विषाणूमुळे टाळेबंदी लागू झाल्याचा परिणाम मालमत्ता कर वसुलीवर झाला. नागरिकांनी घराबाहेर निघणे बंद केल्यामुळे आपसूकच मनपा प्रशासनाच्या टॅक्स वसुलीचा आलेख घसरला. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर तसेच प्रशासनाने टॅक्सची थकबाकी जमा करण्याचे आवाहन केल्यानंतर थाेड्याफार प्रमाणात कर वसुलीला सुरुवात झाली.
असा केला पगार
वेतनापासून कायम उपेक्षित राहणाऱ्या शिक्षकांना आयुक्त संजय कापडणीस यांनी प्राधान्य दिले. शिक्षकांचे जुलै व ऑगस्ट महिन्यातील वेतन अदा केले. तसेच कंत्राटी व मानसेवी कर्मचाऱ्यांचे मानधन, वर्ग -३ आणि वर्ग – ४ वर्ग कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्यातील वेतन अदा करण्यासाेबतच दिव्यांग कर्मचाऱ्यांना उदरनिर्वाह भत्ता देण्यात आला.