सर्वप्रथम वेदापाठी ब्राह्मण वृंदानी नित्य पूजा-अर्चना करून संकल्प केला. या संकल्प पूजेचे यजमानपद मंडळाचे कार्यकर्ते विजय बंकुवाले यांनी सपत्निक भूषवले. यावेळी मंडळाचे व्यवस्थापक रमेश अलकरी, पदाधिकारी यशोधन गोडबोले, नितीन खोत, विकास वाणी यांची उपस्थिती होती, तसेच या सप्ताहातच नवनाथ पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हे पारायण वेदशास्त्रसंपन्न ज्योतिषचार्य श्री दत्ता महाराज जोशी हे करीत आहेत. गत ३५ वर्षांपासून सर्वसेवाधिकारी आ.गोवर्धन शर्मा यांचे मार्गदर्शनात आणि व्यवस्थापक रमेश अलकरी यांच्या नेतृत्वात हा अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे. ज्यामध्ये अखंड विणा वादन आणि विठूनामाचा जयघोष, सोबत भजन प्रवचन कीर्तन आदी कार्यक्रमांची दरवर्षी रेलचेल असते. सप्ताहाच्या समाप्तीला श्री पंढरीनाथाची भव्य शोभायात्रा शहरांत निघते. त्याच्या दर्शनार्थ भाविकांची रीघ लागते, तसेच मुख्य अभिषेक पूजा आषाढी एकादशीचे दिवशी पहाटे ४ वाजता मंडळाचे सर्वसेवाधिकारी गोवर्धन शर्मा व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते संपन्न होत असते. मागील वर्षीपासून कोरोनामुळे या कार्यक्रमांवर मर्यादा आली असली, तरी धार्मिक परंपरेनुसार आणि प्रथेप्रमाणे या वर्षी हा सप्ताह होणार आहे.
३१८ वर्षे पुरातन मंदिर
जुने शहरातील श्री विठ्ठल मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीला भाविकांची मांदियाळी असते. हे मंदिर ३१८ वर्षे पुरातन आहे. येथे ८८ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे.