अकोला: एमआयडीसी भागातील गोडावूनमध्ये पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी दुपारी घातलेल्या संयुक्त छाप्यामध्ये लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. यामध्ये गुटख्यासह सुगंधित तंबाखू व पान मसाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती. तीन ठिकाणांवरून जप्त केलेल्या गुटख्याची एकूण किंमत १0 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनातील विशेष पथकाला एमएच ३0 ए ९१३७ क्रमांकाच्या ऑटोरिक्षातून गुटखा येत असल्याची माहिती मिळाली. पथकाने ऑटोरिक्षाचा पाठलाग केला. हा ऑटोरिक्षा न्यू राधाकिसन प्लॉटमधील रमणकुंज अपार्टमेंटजवळ येताच पोलिसांनी ऑटोरिक्षा थांबवून त्यातील साहित्याची तपासणी केली असता, गुटख्यासह सुगंधित तंबाखूचे पाकिटे दिसून आली. ऑटोरिक्षा चालकाची चौकशी केली असता, त्याने रमणकुंज अपार्टमेंटमध्ये राहणारे हरीश केशवलाल सांगाणी यांच्या मालकीचा हा गुटखा असल्याचे सांगितले. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी सांगाणी यांच्या फ्लॅटची झडती घेतली. फ्लॅटमध्येही पान मसाला, सुगंधित तंबाखू व सुपारीचे २२ बॉक्स मिळून आले. या प्रकरणी पोलिसांनी हरीश सांगाणी, ऑटोरिक्षा चालक संतोष पाटकर आणि विठ्ठल बुंदे यांना ताब्यात घेतले. या तिघांवर उशिरा रात्रीपर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तर आशिष अग्रवाल, घनश्याम अग्रवाल, वहीद खान आणि कल्लू नामक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. ही कारवाई एपीआय सचिन जाधव, परिविक्षाधिन पीएसआय ए.पी. खोडेवाड, अन्न व औषध निरीक्षक नितीन नवलकार यांनी केली.
अकोल्यात पुन्हा १0 लाख रुपयांचा गुटखा जप्त
By admin | Published: November 06, 2014 1:11 AM