अकोला : ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांनी शासनाच्या विविध योजनांतून गेल्या दहा वर्षांत ७२ पैकी ६७ नळ पाणी पुरवठा योजना अद्यापही अपूर्ण आहेत, सोबतच इतरही ३४ योजनांसाठी निधी खर्च झाला. त्या सर्व योजनांची झाडाझडती मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी मंगळवारी जिल्हा परिषद सभागृहातील बैठकीत घेतली. यावेळी संबंधित गावांचे सरपंच, सचिव, समिती अध्यक्ष, सचिवांसह १५० पेक्षाही अधिक पदाधिकारी उपस्थित होते.शासनाने ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांचे नियोजन, अंमलबजावणी, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता समितीकडे सोपविली; मात्र समितीमार्फत झालेल्या कामांची गुणवत्ता, असमाधानकारक प्रगती, निधीमध्ये अपहाराचीच प्रकरणे पुढे आली. त्यामुळे समितीचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय शासनाने फेब्रुवारी २०१८ मध्येच घेतला. त्यानुसार जिल्हा परिषदेला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामध्ये ठरलेल्या काळात पूर्ण न झालेल्या तसेच तीन वर्षांपासून प्रलंबित योजना शिल्लक निधीसह जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे म्हटले.- फौजदारी कारवाईचा वेग वाढणार!शासनाने योजनेच्या अंमलबजावणीबाबत पाणी पुरवठा समितीला असलेले दोन कोटींचे अधिकार रद्द केले. जिल्हा परिषदेला पाच कोटींपर्यंतच्या योजना, तर त्यापेक्षा अधिक निधीच्या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपविल्या जाणार आहेत. त्याची माहिती घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी पगारे यांनी मंगळवारी बैठक बोलाविली. जिल्ह्यातील १०१ योजनांची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यावर समित्यांकडून हिशेब घेणे, अपहाराची रक्कम वसूल करणे, पूर्ण झालेल्या योजनांची माहिती घेणे, रक्कम वसुली होत नसल्यास फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.- २००७ पासूनची कामे अद्यापही अपूर्णजिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून २००७-०८ मध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या खात्यावर निधी देण्यात आला. ७२ पैकी ६७ योजना अद्यापही अपूर्ण आहेत. त्यासाठी २५ कोटींपेक्षाही अधिक निधी खर्च झाला.- लाखो रुपये खर्चूनही पाणी न मिळालेली गावेबार्शीटाकळी तालुक्यातील परंडा, तामशी, काजळेश्वर, उमरदरी, पाराभवानी, भेंडीमहाल, महान, साहित, सुकळी, खेर्डा, राजनखेड, महागाव, भेंडगाव, महागाव माळी, चोहोगाव, लोहगड, सावरखेड. अकोट तालुक्यातील पिंप्री जैनपूर, चंडिकापूर, देऊळगाव, बोर्डी, जळगाव नहाटे. तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ बु., सदरपूर, धोंडा आखर, चितलवाडी, चांगलवाडी, खाकटा, दानापूर, खापरखेड, वडगाव रोठे. बाळापूर तालुक्यातील कळंबा बु., तामशी, झुरळ, कसुरा, सावरपाटी, मनारखेड, पिंपळगाव, सोनगिरी, खिरपुरी बु., कडोशी, व्याळा, बारलिंगा, कवठा, लोहारा. पातूर तालुक्यातील पांढुर्णा, पांगरा, डिग्रस, सोनुना, निमखेड, राहेर, सावरगाव, पळसखेड, अडगाव खु., सस्ती, भंडारज खु., खापरखेडा, हिंगणा वाडेगाव, सुकळी, अंबाशी, चतारी, पिंपळखुटा. मूर्तिजापूर तालुक्यातील बपोरी, दाताळा, नवसाळ व सोनोरी.