- नितीन गव्हाळेअकोला - कोर्टाच्या वारंटची अंमलबजावणी न करता, पुढील तारीख वाढवून देण्यासाठी कोर्टात रिपोर्ट सादर करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार महिलेला दोन हजार रूपयांच्या लाचेची मागणाऱ्या गृहरक्षक दलाच्या दोन जवानांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी उशिरा रात्री रंगेहात अटक केली.
तक्रारदाराने ११ मार्च २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. या तक्रारीनुसार तक्रार दिली की, त्याच्या पत्नीने वर्षभरापूर्वी मातोश्री नागरी सह पतसंस्था तेल्हारा मर्या. याच्याकडून ५० हजार रूपये कर्ज घेतले होते. त्यापैकी पतसंस्थेने ३५ हजार रुपये कर्ज देवून १५ हजार रूपये डिपाॅजिट म्हणून ठेवुन घेतले. त्यावेळी तक्रारदाराने गॅरेंटर म्हणून पत्नीच्या नावाचा चेक दिलेला होता परंतु सदर कर्ज थकित झाल्याने, पतसंस्थेने चेक वटविला असता, तो वटला नाही.
त्यामुळे पतसंस्थेने तेल्हारा न्यायालयात कलम १३८ प्रमाणे चेक बाऊन्स झाल्याबाबत दावा दाखल केला. त्यामुळे तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे कोर्टाकडून पकडण्याचे वारंट निघाले. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावाचे कोर्टाचे वारंट अमंबजावणी न करता पुढील तारीख वाढवून मिळणेबाबत कोर्टात रिपोर्ट सादर करण्याच्या मोबदल्यात होमगार्ड कर्मचारी अलकेश रमेशराव सिरे(४८) रा. गजानन नगर तेल्हारा आणि त्याचे सहकारी किशोर सिताराम वाडेकर(५५) रा. साईनगर तेल्हारा यांनी २ हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १ हजार रूपये घेण्याचे ठरविले.
१८ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराजा श्री अग्रेसन टॉवर चौक, तेल्हारा येथे सापळा कारवाई करण्यात आली. दरम्यान आरोपी किशोर वाडेकर यांना संशय आल्याने त्यांनी लाच स्विकारली नाही. एसीबीने दोनही आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे तेल्हारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक शैलेश सपकाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, पो.नि सचिन सावंत, पोलीस अंमलदार डिगांबर जाधव, श्रीकृष्ण पळसपगार, किशोर पवार सलिम खान यांनी केली आहे.