लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत यावर्षी राबविण्यात येणाऱ्या विविध २ कोटी ५ लाख रुपयांच्या योजनांना शुक्रवारी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत महिला व मुलींसाठी विविध प्रशिक्षण आणि वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार २ कोटी ५० लाख रुपयांच्या योजना राबविण्यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभेत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात अंगणवाड्यांतील मुलांना घरपोच पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात येत असून, आहार वाटपासंदर्भात पालकांकडून तक्रारी होत असल्याच्या पृष्ठभूमीवर महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी काही गावांत भेटी देऊन पौष्टिक आहार वाटपाची पाहणी करण्याचे या सभेत ठरविण्यात आले. महिला व बालकल्याण सभापती मनीषा बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत समितीच्या सदस्य ऊर्मिला डाबेराव, गायत्री कांबे, अनुसया राऊत, योगीता रोकडे, रिजवान परवीन, लता नितोने, वंदना झळके, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे, संतोष ताथोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.प्रशासकीय मंजुरी दिलेल्या अशा आहेत योजना!महिला व बालकल्याण समितीच्या सभेत २ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये गरोदर मातांना पौष्टिक आहार वितरण १५ लाख रुपये, पाचवी ते बारावीत शिकणाºया मुलींना सायकल वाटप १५ लाख रुपये, ९० टक्के अनुदानावर शिलाई मशीनचे वाटप १५ लाख रुपये, अंगणवाड्यांना सतरंजी पुरविणे १५ लाख रुपये, पिको मशीनचे वाटप १० लाख रुपये, अंगणवाडीतील मुलांना डेस्क-बेंच पुरविणे २० लाख रुपये, अंगणवाड्यांना लोखंडी कपाट पुरविणे २० लाख रुपये,अंगणवाडीतील मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देणारी खेळणी पुरविणे १० लाख रुपये, अंगणवाड्या डिजिटल करणे ५ लाख रुपये तसेच अंगणवाडी-बालवाडी सेविकांना आदर्श पुरस्कार वितरित करणे १ लाख रुपये, महिला समुपदेशन केंद्र चालविणे १५ लाख रुपये, मुलींना एमएससीआयटी प्रशिक्षण देणे १८ लाख रुपये, मोबाइल-संगणक दुरुस्ती प्रशिक्षण १३ लाख ५० हजार रुपये, महिला सौंदर्य प्रसाधनांचे प्रशिक्षण २५ लाख रुपये, मुलींना कुटुंब नियोजन कायदेविषयक प्रशिक्षण ३ लाख रुपये व शिवणकाम -फॅशन डिझाइनचे प्रशिक्षण २० लाख रुपये इत्यादी योजनांचा समावेश आहे.
अकोला : २.५० कोटींच्या योजनांना मंजुरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:55 PM