अकोला: यंदा कोरोनाचे संकट असले, तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत ऑटोमोबाइल्स क्षेत्रात तेजी दिसून आले. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच १५ दिवसांत २५०३ पेक्षा जास्त वाहनांची विक्री झाली असून, यामध्ये दुचाकीसह कार आणि मालवाहू वाहनांचाही समावेश आहे. कोरोना काळातील सहा महिने सर्वच व्यवहार ठप्प होते. अनलॉकनंतर हळूहळू बाजारपेठ रुळावर येऊ लागली. दिवाळीत मात्र बाजारपेठेने मोठी उसंडी घेतली. इतर क्षेत्राप्रमाणे ऑटोमोबाइल्स क्षेत्रातही तेजी दिसून आली. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात दिवाळी होती. या महिन्यात २,४०९ वाहनांची खरेदी झाली होती, तर यावर्षी दिवाळीच्या कालावधीत १५ दिवसांतच २,५०३ वाहनांची विक्री झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी झाली. यामध्ये २,०९५ दुचाकी, तर उर्वरित इतर वाहनांचा समावेश आहे. तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ७५ वाहनांची खरेदी या काळात करण्यात आली आहे.
दुचाकी - २,०९५
चार चाकी - ४०८
ऑक्टोबर
२०१९ - २४०९
२०२० - २२१०
लाखावरील दुचाकींची मागणी जास्त
दिवाळीच्या काळात दुचाकी खरेदी करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे. तरुणांमध्ये प्रामुख्याने स्पोर्ट बाइकची क्रेझ असल्याने दुचाकीमध्ये याच प्रकारातील गाड्यांची जास्त विक्री झाल्याचे आढळून आले. इतर दुचाकींच्या तुलनेत स्पोर्ट बाइकच्या किमती या जास्त असल्या तरी तरुणाईला या गाड्यांची आकर्षक बनावट आकर्षत करते.
जुनी दुचाकी खराब झाली होती. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन दुचाकी घेण्याचे नियोजन केले होते; परंतु कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद होते. अनलॉक फेजमध्ये सर्वकाही सुरू झाले, अशा परिस्थितीत दिवाळीसारखा मुहूर्त चांगला असल्याने याच मुहूर्तावर दुचाकी खरेदी केली.
- प्रशांत पाटील, दुचाकी ग्राहक
कोरोना काळात सर्वच व्यवहार ठप्प पडले होते. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला दुचाकी घेऊ शकलो नाही. लॉकडाऊनच्या काळातील परिस्थितीही गंभीर होती; मात्र आता सर्व सुरळीत होताना दिसत आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी घेण्याचा योग आला.
- गणेश तायडे, दुचाकी ग्राहक