अकोला : ग्रामीण भागातील बालकांना बसण्यासाठी असलेल्या अंगणवाडी इमारतींची दुरवस्था झाली असून, त्यापैकी जिल्ह्यातील ३७९ इमारती दुरुस्त करण्याला मंजुरी मिळाली; मात्र अद्यापही काम सुरू न झाल्याने पावसाळ्यापूर्वी ती कामे पूर्ण होणे अशक्य झाले आहे. ग्रामीण भागातील अंगणवाड्यांसाठी इमारती नाहीत. त्यामुळे बालकांना खासगी किंवा भाड्याच्या इमारतीमध्ये बसावे लागते. त्यातच बालकांना बसण्याची जागा सुरक्षित नसल्याने त्यांच्या सुरक्षिततेबद्दलही धोका निर्माण होतो. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून दरवर्षी अंगणवाडी बांधकाम व दुरुस्तीसाठी निधी दिला जातो. जिल्हा नियोजन समितीने एप्रिल २०१९ मध्ये जिल्ह्यातील अंगणवाडी इमारत दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला. प्रत्येक इमारत दुरुस्तीसाठी १ लाख रुपये मंजूर आहेत.त्या निधीतून बांधकाम करावयाच्या इमारतींच्या कामांना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आॅगस्ट २०१९ मध्ये प्रशासकीय मान्यता दिली. त्यानुसार तातडीने कामे सुरू करण्याचेही बजावले.विशेष म्हणजे, त्या आदेशात ३१ मार्च २०२० पर्यंत काम पूर्ण करण्याचे म्हटले होते. त्यापैकी अनेक कामे अद्यापही सुरूच झालेली नाहीत. आता पावसाळा तोंडावर आला आहे. त्यातच कोरोना विषाणू संसर्गाचा धोका असल्याने बांधकामेही सुरू झालेली नाहीत. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण न झाल्याने बालकांना यावर्षीही शिकस्त इमारतींमध्येच बसण्याची वेळ येणार आहे. - तालुकानिहाय मंजूर दुरुस्ती कामे तालुका कामे अकोला १0२ मूर्तिजापूर 0६ बार्शीटाकळी ७५ पातूर ५0 बाळापूर २१ अकोट ७४ तेल्हारा ५0