लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना मिळालेल्या ७६ शिक्षकांपैकी ६0 फायली जिल्हा परिषदेत परत आल्या आहेत. उर्वरित १६ फायली अद्यापही कार्यालयाबाहेर आहेत. त्यातच नोटीस बजावलेल्या तिघांपैकी एक नवृत्त दुसरा बडतर्फ तर सेवेत असलेल्या तिसर्यावर सर्वाधिक फाइलची जबाबदारी असताना त्या कर्मचार्याने अद्यापही स्पष्टीकरण सादर केली नसल्याची माहिती आहे.जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांमुळे बिंदूनामावलीत मोठा घोळ आहे. त्यामध्ये आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या ७६ शिक्षकांच्या फायली गहाळ आहेत. त्यांच्या केवळ आदेशाच्या प्रती उपलब्ध आहेत. त्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत पदस्थापना देण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात फाइल कोणी तयार केली, त्या फाइलला कोणी मंजुरी दिली, त्यानुसार शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठीचे आदेश कोणी दिले, फाइल सुरू होण्यापासून शेवटपर्यंतचा प्रवास, याबाबतचा कुठलाच कागद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध नाही. त्या शिक्षकांना फाइल सादर करण्याची नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी २ डिसेंबर रोजी दिली. त्यासोबतच या प्रकाराला जबाबदार असलेल्या शिक्षण विभागातील सर्व संबंधित अधिकारी-कर्मचार्यांनाही नोटीस बजावली. त्यापैकी चौघांनी स्पष्टीकरण दिले, तर सेवानवृत्त कक्ष अधिकारी रंजना गेडाम, बडतर्फ कर्मचारी बिपिन कमाविसदार यांच्या नोटीसबाबतच संभ्रम आहे.
चौघांचे अद्यापही स्पष्टीकरण नाही!इतर जिल्हा परिषदेतून आलेले शिक्षक रुजू झाल्यानंतर त्यांच्या फाइल जतन करण्याची जबाबदारी अकोला जिल्हा परिषदेची आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचार्यांनी फाइल सादर न केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ अन्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. नोटीसप्राप्त अधिकार्यांमध्ये सेवानवृत्त कक्ष अधिकारी रंजना गेडाम यांना तीन, बाळापूर पंचायत समितीमध्ये कार्यरत लेखा विभागाचे कनिष्ठ सहायक दिनेश ढाकरे-एक, कमाविसदार यांनी स्पष्टीकरण सादर केलेले नाही. त्यामुळे त्यांना स्मरणपत्र देण्याची तयारी सुरू आहे. त्याचवेळी स्पष्टीकरण सादर केलेल्यांच्या संदर्भातही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक फायलींबाबत संतोष टाले मौनया प्रकरणात सर्वात महत्त्वाची भूमिका तेल्हारा पंचायत समितीमध्ये कार्यरत लेखा विभागाचे कनिष्ठ सहायक संतोष टाले यांची आहे. स्पष्टीकरण सादर करणार्या चौघांपैकी दोघांनी प्रभार घेताना टाले यांच्याकडून फायली मिळाल्याच नसल्याचे म्हटले. गहाळ झालेल्या ७६ पैकी ३२ फायलींची जबाबदारी टाले यांची आहे. त्यांनी अद्यापही स्पष्टीकरण दिले नाही.